

Uttarakhand Congress update : देशातील पुढीलवर्षी पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापैकी दोन राज्यांमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पंजाबमध्ये मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर आता उत्तराखंडमधील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे इथेही माजी मुख्यमंत्र्यांनीच पक्षाला जेरीस आणले आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व गांधी कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे नेते हरीश रावत सध्या दिल्लीत चर्चेच विषय बनले आहेत. हरीश रावत यांनी काही दिवसांपासून पक्षाला विश्वासात न घेता राज्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला प्रदेश काँग्रेस किंवा दिल्लीचा पाठिंबा नाही.
राज्याच्या प्रभारी खासदार कुमारी सैलजा यांनीही चार दिवसांपूर्वीच रावत यांना पत्र लिहित दौरा थांबविण्याचा संदेश दिला होता. आपल्या दौऱ्याची माहिती मलाही नाही. पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असून पक्षातील सर्व नेत्यांनी संघटितपणे या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशावेळी तुमचा दौरा चुकीचा संदेश देत असल्याचे संदेश सैलजा यांनी रावत यांच्यापर्यंत पोहोचविला होता.
सैलजा यांच्या पत्रानंतर रविवारी रावत यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रावत आपला दौरा थांबतील, अशी चर्चा होती. मात्र, सोमवारी सकाळीच त्यांनी दौऱ्याबाबत सोशल मीडियात सूचक पोस्ट करत पक्षालाच शिंगावर घेतल्याची चर्चा आहे.
रावत यांनी म्हटले आहे की, 'सहकाऱ्यांनो मोठे आव्हान आहे. पण उत्तराखंडच्या स्वाभिमानासाठी आपला दृढ संकल्प आहे. जनसंवाद यात्रा आता थांबणार नाही. राज्यात परिवर्तन घडवायचे आहे आणि काँग्रेसची सत्ता आणायची आहे.' रावत यांनी पक्षाने थांबविण्याचा प्रयत्न करूनही त्याकडे थेट दुर्लक्ष करत एकप्रकारे पक्षालाच आव्हान दिले आहे.
राज्यातील काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असा संदेश आता पक्षात गेला आहे. रावत यांच्याशिवायही पक्षाला राज्यात दुसरा तगडा पर्याय नाही. रावत यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात एन्ट्री केलेले अनेक पदाधिकारी, नेते आहेत. त्यांच्या दौऱ्यात मिळणाऱ्या प्रतिसादावरून त्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे काँग्रेसला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रावत यांना विश्वासात घेऊनही पक्षाला रणनीती आखावी लागणार आहे.
रावत हे कितीही नाही म्हणत असले तरी त्यांना अजूनही मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच २०१६ च्या एका प्रकरणात रावत यांच्या एका सहकाऱ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचीही या प्रकरणात चौकशी झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ते काहीसे बॅकफुटवर गेले आहेत. हे राजकीय नुकसान भरून काढण्यासाठी आणि पक्षात आपले स्थान अजूनही बळकट आहे, हे दाखविण्यासाठी त्यांनी हा दौरा काढल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.