
Mumbai news : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज व उद्धव ठाकरे बंधू महिनाभरातच दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. त्यामुळे एकीकडे महायुतीने रणनीती बदलली आहे. तर दुसरीकडे गेल्या तीन-चार महिन्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकाची धडधड चांगलीच वाढली आहे. त्यातच सीएम फडणवीस यांनी नगरविकास खात्याबाबत घेतलेला निर्णय त्यासोबतच राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी या दोन घटनांमुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटका बसणार आहे.
गेल्या काही दिवसातील हालचाली पाहिल्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची शक्यता वाढली आहे. एकाच महिन्यात दोनदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत आल्याने त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. वरळीत ५ जुलैला विजयी मेळाव्यासाठी दोघे जण एकत्र आले. त्यानंतर २२ दिवसांनी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते.
राज आणि उद्धव यांच्या भेटीगाठींचा पहिला फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे. त्यामुळे गेल्या दहा ते १५ दिवसापासून मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून येणारे माजी नगरसेवक थांबले आहेत. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील गळती थांबली आहे. ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता वाढलेली असताना अनेक माजी नगरसेवक पक्षात थांबले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली होते. उद्धवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेचा रस्ता धरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धवसेनेचे जवळपास निम्मे माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे ५ जुलैला एकत्र दिसल्यापासून आणि युतीची चर्चा सुरु झाल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील इनकमिंगला ब्रेक लागला आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं निर्णय घेतला होता. त्यामुळेच याच मुद्द्यावरुन मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून जनमत विरोधात जात असल्याचे लक्षात येताच महायुती सरकारने दोन्ही जीआर मागे घेतले आहेत. विशेष म्हणजे हे जीआर शिंदेसेनेच्या दादा भुसे यांच्या शिक्षण खात्याने काढले होते. त्यामुळे शिंदेसेनेवर मोठी नामुष्की ओढवली आहे. ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर एकनाथ शिंदेची शिवसेना बॅकफूटवर गेली आहे.
त्यातच गेल्या काही दिवसापासून शिंदेसेनेकडे जाणारा माजी नगरसेवकांचा ओढा रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक निर्णयदेखील महत्त्वाचा ठरला आहे. शिंदे यांच्या अखत्यारित येणाऱ्या नगरविकास विभागाच्या फाईल्स मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवाव्या लागणार आहेत. तसा निर्णय फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यामुळे पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याने. या खात्याच्या मार्फत शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या महापालिकांनाच अधिक निधी जात असल्याच्या तक्रारी पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केल्या होत्या. त्यामुळे त्याचा फटका देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे.
आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले अनेक माजी नगरसेवक कामाला लागले होते. विशेष म्हणजे निधीचे कारण देतच अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता अचानक ब्रेक लागला आहे. राज्यातील अनेक पालिकांवर सध्या प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे पालिकांचा कारभार नगरविकास विभागाकडूनच चालतो. त्यामुळे उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेची वाट धरली होती. पण आता सीएम फडणवीस यांच्या एका निर्णयामुळे पक्षप्रवेश केलेले अनेक माजी नगरसेवक अडचणीत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.