Dharashiv News : शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर्षी पडले. बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांना सांभाळणे, त्यांना हवे नको ते पाहणे आणि त्यासाठीची खर्चाची जबाबदारी अनेकांनी उचलली होती. काटेकोर नियोजनामुळे ते बंड फसले नाही. यासाठी 'योगदान' देणाऱ्यांचा उचित गौरव करण्यात आला. काही जणांना मंत्रिपदे मिळाली, काहीजणांना मंत्रिपदासह अन्य बक्षिसेही मिळाली. त्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा समावेश आहे. इतके सगळे मिळूनही सावंत समाधानी नाहीत का? असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये डॉ. तानाजी सावंत हे मंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीनंतर मात्र ही युती तुटली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला, मात्र ते सरकार अल्पजीवी ठरले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. यापूर्वीच्या युतीच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांचे वजन होते. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक खूप वाढली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मात्र हे समीकरण बिघडत गेले. सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. सरकार तीन पक्षांचे होते. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळात समावेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. अखेर सावंत यांना त्यातून डावलण्यात आले.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे सावंत बिथरले होते. त्यापूर्वी त्यांनी विदर्भातून विधान परिषदेची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे पैशांच्या बळावर काहीही करता येते, असा त्यांचा समज झाला होता. किंबहुना, असा समज निर्माण होण्यासाठी उद्धव ठाकरेही जबाबदार होते. मंत्रिपद न देऊन उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या या समजाला ब्रेक लावला होता. मात्र तो ब्रेक तात्पुरता आहे, हे सावंत यांनी सिद्ध केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सावंत हेही शिवसेनेतून बाहेर पडले. यात त्यांनी मोठी जबाबदारी उचलली. एका विभागातील आमदारांना हवे,नको ते पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, असे सांगितले जाते. त्याचे बक्षीस त्यांना मिळणारच होते. पहिल्याच टप्प्यात ते कॅबिनेटमंत्री झाले. सावंत यांच्याशी संबंधित असलेल्या जेएसपीएम या शिक्षण संस्थेला स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ म्हणून नोव्हेंबर २०२२ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे आणि परिसरात सावंत यांची जेएसपीएम ही शिक्षण संस्था आहे. शाळेसह अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये चालवली जातात.
कॅबिनेट मंत्रिपदासह शिक्षण संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळूनही तानाजी सावंत समाधानी नाहीत का, असा प्रश्न अलीकडच्या काळातील त्यांचे वागणे पाहून निर्माण झाला आहे. मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असे ते अलीकडेच एका आयपीएस अधिकाऱ्याशी बोलताना म्हणाले आहेत. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील मृत्यूंसाठी सर्व मंत्रिमंडळच जबाबदार आहे, असे वक्तव्य करून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केली होती.
सावंत हे धाराशिवचे पालकमंत्रीही आहेत. मध्यंतरी निधी वाटपावरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. त्यावेळी आमदार पाटील यांनी त्यांना झटका दिला होता. त्यामुळे सैरभेर झालेल्या सावंत यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर (ठाकरे गट) यांच्याशी जवळीक असल्यासारखे वाटावे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सने भाडेतत्वावर घेतलेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ नुकताच झाला. त्या कार्यक्रमातही त्यांनी ऊसदराच्या बाबतीत जिल्ह्यातील अन्य कारखान्यांना आव्हान देणारी भाषा केली. प्रत्यक्षात, धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना आणि नॅचरल शुगर्स (एनसाई) या खासगी साखर कारखान्याने राज्यभरात नावलौकिक कमावला आहे. मंत्रिपद अन्य बक्षिसे तर मिळाली, त्यासोबतच अंगी थोडा विनम्रपणा मिळाला असता तर किती बरे झाले असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.