Parbhani News : जगात जर्मनी व देशात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या परभणीचा राजकीय पॅटर्नही वेगळाच आहे. 1989 पासूनचा परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या ठिकाणी एक वेळेसचा अपवाद वगळता सलग सहा वेळा शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून आला आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही, असाही इथला इतिहास आहे. या पॅटर्नच्या धास्तीनेच येथे शिवसेनेतील बंडखोरी टाळली असल्याची चर्चा जोरात आहे. काय व कसा आहे हा आगळा वेगळा पॅटर्न, परभणीतला खासदार पक्ष सोडताना का घाबरतो, त्याचा असा आहे रंजक इतिहास आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघाचा गेल्या 35 वर्षांतील इतिहास पाहिला तर अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर अशी शिवसेनेसोबतच बंड करणाऱ्या खासदारांची मोठी परंपरा लाभली आहे. परभणीत जर शिवसेनेसोबत कोणी बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसविण्यासाठी सज्ज असतात, असा हा गेल्या 35 वर्षांतला इतिहास सांगतो.
त्यामुळेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार बाहेर पडले. मात्र, अशा घडामोडी घडल्यानंतरही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडण्याचे धाडस करू शकलेले नाहीत, ते ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले, हेच त्या मागचे गुपित आहे. त्याच मुळे येत्या काळात शिवसेनेसोबत बंडखोरी करण्याचे धाडस कोणी करू शकेल, असे वाटत नाही.
नव्वदच्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचे मोठे गारुड होते. प्रत्येकजण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झालेला. मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणजे अनेकांसाठी दैवत आणि जीव की प्राण होते. त्या काळात आलेल्या बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने काँग्रेसची नौका किनाऱ्यावर लावताना अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेसचे बालेकिल्ले मात्र बाळासाहेबांच्या झंझावातामुळे सुपडासाफ झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकेकाळी मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचं प्रभुत्व होतं. विशेषतः परभणीत शिवसेनेचा गेल्या 35 वर्षांपासून फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येतो. फक्त 1998 चा अपवाद वगळता एका वर्षातच पुन्हा शिवसेनेचाच खासदार निवडून आला. बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून नेहमी गद्दारांना लाथाबुक्क्यांनी तुडवा, असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे. त्याचमुळे परभणीत प्रत्येकवेळी पक्षाशी गद्दारी झाली अन् लोकांनी त्यांना घरी बसवलं.
परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या 35 वर्षांत पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय, की पक्ष सोडताना प्रत्येक जण दहा वेळा विचार करत असतो.....की पक्ष सोडायचा की नाही. परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यामधील 4 व जालना जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या विधानसभा मतदारसंघांचा तर जालना जिल्हा मतदारसंघातील परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात मूळ शिवसेनेच्या (Shivsena) आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवाऱ्या मिळवल्या, जिंकले, पाच-दहा वर्षे खासदारकी भोगली आणि एवढे होऊन पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत निघूनही गेले.
1990 च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. परभणी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा 1989-90 साली शिवसेनेचे अशोक देशमुख, 1991-96मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख यांना पुन्हा निवडून दिले. मात्र त्यांनी या निवडणुकीनंतर पक्ष सोडला. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अशोक देशमुख यांना खासदार केलं.
पुढे केंद्रातलं नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केले. यामुळे देशमुखांना 1996 च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. पण परभणीतले हे बंड बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं. त्यांनी फारशी राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना निवडणुकीत देशमुखांविरुद्ध मैदानात उतरवलं. नवख्या असलेल्या सुरेश जाधवांनी यांनी अशोक देशमुख यांना आस्मान दाखवले होते.
त्यानंतर 1998 च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव केला. हा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला नाही.1999 मध्ये शिवसेनेनं मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले. पण सुरेश जाधवांनीही 2004 च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. मग शिवसैनिकांनीही त्यांना घरीच बसवले.
2004 मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे-पाटील हे शिवसेनेचे परभणीचे खासदार झाले. पण अणू करारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश झुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेविरोधातच परभणी विधानसभा लढवली. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रेंगे-पाटलांना चारी मुंड्या चित केलं. या माध्यमातून पक्ष सोडणाऱ्या मंडळींना शिवसैनिक धडा शिकवतात हे दाखवून दिलं.
शिवसेनेनं 2009 मध्ये मात्र नवा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले. दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर जाणं पसंत केलं.
(Edited by Deepak Kulkarni)
R.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.