
PM Narendra Modi And Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत भाजपनं धडाकेबाज कामगिरी करत न भूतो भविष्यती असं यश मिळवत तब्बल 230 जागा जिंकल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा अक्षरश:धुव्वा उडाला. विरोधीपक्षनेतेपदही न मिळवण्याइतपत त्यांच्यावर नामुष्की ओढवली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या 237 आमदारांची बैठक घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांची शिकवणी घेतलीच. पण महायुतीच्या बैठकीत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव करतानाच त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीवर सूचक विधान केलं होतं.त्यांनी लोकसभेला आम्हाला मनसेमुळे फायदा झाला,पण विधानसभेला मात्र अगोदरच आम्ही तीन पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांना देण्यासाठी जागा आमच्याकडे नव्हत्या. तरीदेखील इतक्या मोठ्या प्रवाहाच्याविरोधात मनसे लढली.पण महापालिकेच्या निवडणुकीत जिथे सोबत असेल तिथे आम्ही त्यांना सोबत घेऊ.हा एकप्रकारे भाजपकडून मनसेच्या महायुतीत एन्ट्रीला हिरवा कंदीलच मानला गेला.
तसेच यापूर्वीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वारंवार भेटीगाठी झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस हे अनेकदा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी थेट शिवतीर्थावर गेल्याचंही दिसून आलं. तसेच राज ठाकरेंनीही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2024 निवडणुकीत भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं जाहीर विधान केलं होतं. त्यांनी माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष असला तरी मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं सूचक वक्तव्यही केलं होतं.
त्यानंतर राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व स्विकारलं आहे तेव्हापासून ते आयडॉलॉजिकली आमच्यासोबत आले आहे,अशी भूमिकाही फडणवीसांनी निवडणुकीच्या काळात स्पष्ट केली होती. लोकसभा निवडणुकीत आपण मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करणाऱ्या राज ठाकरेंविषयी मोदींनाही साहजिकच प्रेम असणार आहे. त्याचमुळे मोदींनी महायुतीच्या बैठकीत आमदारांची शिकवणी घेताना आदर्श म्हणून उदाहरण राज ठाकरेंचं दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या (Mahayuti) बैठकीत थेट विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून न आलेल्या मनसेच्या राज ठाकरेंचाच उल्लेख केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पण मोदींनी या बैठकीत ठाकरेंचा नामोल्लेख करण्यापाठीमागं भाजपची मोठी व्यूहरचना असल्याचं बोललं जात आहे.
भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग हा भाजपच्या शिर्डीतील राष्ट्रीय अधिवेशन हे होतं. त्या अधिवेशनात आगामी निवडणुका महायुतीत लढण्याचे संकेत दिले असले तरी भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कुठेतरी स्वबळासाठी चाचपणी केली जात आहे. त्यातही मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आणायची संधी दिल्लीतील भाजपचे मुत्सद्दी पक्षश्रेष्ठी सोडतील अशी शक्यता फार कमी आहे.
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर दुणावलेल्या आत्मविश्वासामुळे मुंबई महापालिकेत भाजप प्रचंड तयारीनिशी उतरणार यात शंका नाही.त्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी भाजप जागांबाबत कशी तडजोड करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मुंबईत पहिल्यापासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. जरी यावेळी शिवसेनेत फूट पडली असली तरी एकनाथ शिंदेंचा पक्ष आधीचा इतिहास आणि विधानसभेतील कामगिरीच्या जोरावर महापालिका निवडणुकीत चांगल्या जागांची डिमांड करु शकते. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीही सोबत आहे. अशावेळी भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत वेगळा विचारही करु शकते.
भाजप मुंबई महापालिका निवडणुकीपुरती मनसेसोबत युती करुन येथे वेगळा फॉर्म्युला अस्तित्वात येऊ शकतो. त्याचवेळी लोकसभा निवडणूक न लढलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नसला तरी राज ठाकरेंची मनसेची मुंबईत चांगल्याप्रमाणात ताकद असल्याचं दिसून आलेलं आहे. कारण त्यांनी विधानसभेला मुंबईतील अनेक मतदारसंघात दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकाची मतं घेतली होती. त्यामुळे मनसेला मुंबईत सोबत घेण्यासाठी जुगार भाजप खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर निराशाजनक कामगिरीनंतर शिवतीर्थावर मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. राज ठाकरेंसमोरच या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपची इच्छा असूनही मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही,असं पदाधिकांनी सांगितलं. यामुळे मनसेच्या या आरोपानंतरचं पंतप्रधान मोदींचं राज ठाकरेंवरचं प्रेम आगामी निवडणुकीतील महायुतीतील राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना अशीही चर्चा आहे.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी विशेषत: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय निराशाजनक निकालाला सामोरे जावे लागले.त्यामुळे आधीची टोकाची टीका केल्यानंतर त्यांच्याकडून फडणवीसांशी जुळवुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी असलेली युती तोडत काँग्रेस ,राष्ट्रवादीशी घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. त्याचं शल्य दिल्लीतील नेत्यांच्या मनात आहे. तसेच ठाकरेंनी महाविकास आघाडीत असताना सातत्यानं मोदी-शाहांवर कठोरात कठोर आणि वाईटातून वाईट शब्दांत टीका केली आहे. हे इतक्या लवकर विसरण्यासारखं नाही.
भाजपला त्यामुळेच उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरे केव्हाही जवळचे वाटणं स्वाभाविक आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणं, किंवा 370 कलम हटवल्यानंतर,राममंदिराच्या निर्मितीनंतर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मोदी सरकारचं जाहीर कौतुक केलं होतं. त्यांची भूमिका नेहमीच भाजपच्या राजकारणाला पूरक अशीच राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मुंबई महापालिकेसाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मोठा निर्णय घेऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या बैठकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना अनेक टिप्स दिल्या. तसेच त्यांनी यावेळी राज ठाकरेंचीही आठवण काढली आहे. ते म्हणाले,आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे असा डोसही त्यांनी आमदारांना दिला.
राज ठाकरेंनी 2011 रोजी गुजरातचा दौरा केला होता. तसेच आमदारांनी अभ्यास दौरे केले पाहिजेत. समाज आणि मतदारसंघासोबतच कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे. कामाचा संकल्प करून त्याचे नियोजन केले पाहिजे असंही मोदींनी यावेळी सांगितलं.एकप्रकारे मोदींनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेत राज ठाकरेंचं कौतुक करत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.