
MNS And Shivsena Alliance News : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हा ब्रँड आहे. शिवसेनेत पडलेली फूट हा हे ब्रँड संपवण्यासाठीचा एक प्रयत्न होता, मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाने हा ब्रँड शाबूत असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर 6 महिन्यांत वारे फिरले आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर या ब्रँडवर काजळी चढली, मात्र उद्धव ठाकरे यांनी जिद्द सोडली नाही. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही घोर निराशा झाली. राजकीयदृष्ट्या 19 वर्षांपूर्वी विभक्त झालेले हे दोन बंधू एकत्र येणार, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. हे खरे ठरले तर ते मनसेमध्ये (MNS) फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ठाकरे बंधूंचे मनोमिलन होणार, अशी साधी चर्चा सुरू झाली तरी लोक कान टवकारून ती ऐकतात. तशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली, माध्यमांत वृत्त येऊ लागले की अवघ्या राज्याचे लक्ष तिकडे लागते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मतभेद विसरून एकत्र यायला तयार आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगताच उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र गम्मत अशी, की मनसेतील दुसऱ्या फळीचा या मनोमिलनाला विरोध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचे मनोमिलन मनसेच्या फुटीचे कारण तर ठरणार नाही ना, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, मनसे चित्रपट आघाडीचे अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याला जाहीरपणे विरोध केला आहे. अशी अभद्र युती होऊ नये... अशी पोस्ट खोपकर यांनी समाजमाध्यांत केली. त्यावर जवळपास 400 प्रतिक्रिया आल्या आहेत. यापैकी बहुतांश यूझर्सनी खोपकर यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आले की काही जणांचे दुकान बंद पडणार, त्यामुळे ते विरोध करतात, अशाही प्रतिक्रिया या पोस्टखाली आहेत. संदीप देशपांडे यांनीही दोघा बंधूंच्या मनोमिलनाला कडाडून विरोध केला आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे, मात्र मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. देशपांडे सांगताहेत त्याची माहिती राज ठाकरे यांना नसेल, असे म्हणता येणार नाही. असे असतानाही देशपांडे आणि खोपकर यांची भूमिका मनसेमध्ये फूट पडणार याचे संकेत देणारी आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीची छायाचित्रे खोपकर यांनी आनंदाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. दोन भावांची युती मात्र त्यांना अभद्र वाटत आहे. शिवसेना आणि मनसेत आरोप-प्रत्यारोप, कुरघोड्या झाल्या असतील. त्याची माहिती राज आणि उद्धव यांना आहे. मतभेद बाजूला सारून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास दोघेही तयार झाले आहेत. असे असताना खोपकर आणि देशपांडे यांची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे.
राज आणि उद्धव यांनी एकमेकांना टाळी दिल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. आता राज ठाकरे यांच्याशी वैयक्तिक संबंधही संपले, असे भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर करून टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप, शिवसेनेच्या अन्य नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने राजकारणात खरेच फरक पडणार नसता तर या नेत्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या असत्या का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीची वाट धरली. त्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. अदृश्य शक्तीने मग उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना हाताशी धरून शिवसेना फोडण्यात आली. शिवसेनेचे फुटलेले आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले, त्यावेळी भाजपचे नेते त्यांच्यासोबत असल्याचे देशाने पाहिले आहे. घाबरायचे कारण नाही, आपल्या पाठीमागे महाशक्ती आहे, असे शिंदे यांनी गुवाहाटीत आमदारांना सांगितले होते. महाशक्ती म्हणजे भाजप, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आता बारी मनसेची आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी युती नको, अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या माध्यमातून मनसेत फूट पाडली जाऊ शकते, असे जाणकारांना वाटत आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत, राज्याच्या राजकारणाचे चित्रही बदलणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्वाधिक अडचण एकनाथ शिंदे यांची होणार आहे, असे त्यांच्या नेत्यांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे. एकंदरित, फटका सत्ताधाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे अदृश्य शक्ती मनसेमध्ये फूट पाडणार, अशी शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.