
Mumbai News : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर करण्यात आला होता. याप्रकरणी हगवणे कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातच दुसरीकडे या प्रकरणात मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले जात आहेत.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते. त्यामुळे सुपेकर यांच्या अडचणीत भर पडली असतानाच आता भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्याने अडचणीत भर पडली आहे.
पोलीस दलात उप महासमादेशक होमगार्ड या पदावर कार्यरत असलेले जालिंदर सुपेकर हे मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक आहेत. हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाशी सुपेकर यांचे काय संबंध आहेत का ? याचा शोध घेतला जात असतानाच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना त्याची दिल्याचे पुढे आले होते. त्यासोबतच वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना पदनावती करण्यात आली होती.
त्यानंतर सुपेकर यांच्यावर भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा धस यांनी केला. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत होते. मात्र, यानंतर आता सुरेश धस यांनी सुपेकर यांच्या अडचणी वाढवणारे वक्तव्य केले आहे.
आयजी पोस्टवर असलेला माणूस एक लाख रुपये रोख घेतो आणि 50 हजाराचा मोबाईल घेतो, यापेक्षा दुर्दैव काय असावे. सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे, असे सुरेश धस (Suresh Dhas) यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियानी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सुपेकर यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना मदत केली असून, त्यांच्या प्रभावाचा वापर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केली. त्यासोबतच कारागृह व्यवस्थापनात 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .याशिवाय, सुपेकर यांनी वाल्मिक कराड या आरोपीला बीडच्या कारागृहात ठेवण्यासाठी मदत केली, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे. हे सर्व आरोप जालिंदर सुपेकर यांनी फेटाळून लावत यावर अधिक प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
सुपेकर यांच्यावर करण्यात आलेल्या या सर्व गंभीर आरोपांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. राज्य सरकारने तपास समिती स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले, तर सुपेकर यांच्या कारकिर्दीला मोठा आघात बसू शकतो.यासोबतच, महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेतील पारदर्शकतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने यंत्रणेमधील गोंधळ अधोरेखित झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.
जालिंदर सुपेकर हे आयपीएस अधिकारी म्हणून अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिले आहेत. मात्र, वैष्णवी हगवणे प्रकरण, पदावनती आणि आता धस व दमानिया यांनी केलेले आरोप यांच्या परिणामी त्यांच्यावरचा विश्वास ढासळल्याचे चित्र दिसते. आगामी काळात चौकशी आणि सरकारची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.