
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. जवळपास चार वर्षानंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. राज्यातील जवळपास 257 नगरपलिका, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्या व 29 महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. सुरुवातीला कोरोनाच्या कारणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणानुसारच चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरु केली होती. त्यातच प्रभाग रचना व निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी जवळपास पूर्ण झाल्यानंतर राज्यातील निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या दिली असल्याने आता निवडणुकीविषयीचा संभ्रम दूर झाला आहे. विशेष म्हणजे एकत्र निवडणूक घेण्यासाठी यंत्रणा तुटपुंजी असल्याने टप्याटप्याने निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आता महायुती व महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी काय प्लॅनिंग केले जाणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चार वर्षानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्सहाचे वातावरण आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना मोठया प्रमाणात संधी मिळते. त्यामुळे या निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात.
या निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी सर्वच पक्षाला मोठा वेळ मिळाला आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने केली आहे. सुरुवातीला महायुती या निवडणुकीला स्वबळावर लढवेल, असे चित्र दिसत होते. निवडणुका स्वबळावर लढून निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे प्लॅनिंग महायुतीने केले होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बंधू एकत्र आले आहेत. येत्या काळात ठाकरे बंधू राजकीयदृष्टया एकत्रित येणार असल्याची शक्यता गृहीत धरत त्याची धास्ती भाजपने घेतली आहे. त्यामुळेच येत्या काळात होत असलेल्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहे.
महायुतीमध्ये भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला समोरे जाणार आहेत. त्यामुळेच महायुतीकडून निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणुका झाल्या असत्या तर सध्या राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता असल्याने निवडणुका दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात सत्ताधारी महायुतीला यश आले आहे. त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा होईल. त्यानंतर डिसेंबर व जानेवारीत या निवडणुकीसाठी टप्याटप्पयाने मतदान होणार आहे.
सत्ताधारी महायुतीमुळे सुरुवातीला नगरपालिका, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका मधल्या काळात होण्याची शक्यता आहे तर महापालिकेच्या निवडणुका शेवटी होतील, असा अंदाज आहे. सत्ताधारी पक्षाला मुंबई महापालिका निवडणूक कसल्याही परिस्थतीत जिंकायची आहे. त्या निवडणुकीचे प्लॅनिंग करण्यासाठी वेळ हवा असल्याने या महापालिका निवडणुका सर्वात शेवटी होतील, असा अंदाज आहे.
आतापर्यंतच्या निवडणुकीचा पॅटर्न पहिला तर अवघड पेपर सोपा करण्यासाठी ही रणनीती अवलंबली गेली आहे. त्यानुसारच सत्ताधारी महायुतीकडून अवघड असलेली मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात शेवटी ही निवडणूक घेतली जाणार आहे. तोपर्यंत या ठिकाणचे वातावरण महायुतीच्या बाजूने होईल, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या वेळापत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अद्याप प्लॅनिंग करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना येत्या काळात राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का ठाकरे बंधू स्वबळावर निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे.
दुसरीकडे काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट करीत त्यांनी आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यावर सोपवला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढले तर काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अद्याप तीन महिन्याचा वेळ असल्याने आता काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.