Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

Eknath Shinde news : आठच दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून घेत त्यांची समजूत काढली होती. पण या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

Prasad Shivaji Joshi

Shivsena UBT News : दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, नेते लवकरच हे ऑपरेशन होणार, असा दावाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर आठच दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून घेत त्यांची समजूत काढली होती. पण या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

परभणी कायम शिवसेना (Shivsena), बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला जिल्हा आहे. पक्षाला धनुष्यबाण हे निवडणुक चिन्ह मिळवून देण्यात याच परभणीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मतदार कायम शिवसेनेच्या पाठीशी राहीला असला तरी परभणी जिल्ह्याला खासदारांच्या गद्दारीची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांना खंबीर साथ देणार संजय जाधव उर्फ बंडू बाॅस हा परभणीचा 'वाघ' शिंदेंच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ठाकरेंच्या मुंबईतील बैठकीतील त्यांची गैरहजेरी ही पक्षाला अखरेचा जय महाराष्ट्र तर ठरणार नाही ना? याबद्दलही अनेक तर्क लढवले जात आहेत. राजकीय क्षेत्रात स्थान, वेळ आणि राजकीय परिस्थिती पाहता उपस्थिती पेक्षा अनुपस्थिती लक्ष वेधून घेते. पक्षाने आयोजित केलेली बैठक अथवा कार्यक्रमास किती उपस्थित होते, यापेक्षा अनुपस्थित कोण होते याचीच जास्त चर्चा होते.

अशाच एका अनुपस्थितीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. ही अनुपस्थिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परभणीचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांची. ऑपरेशन टायगर, राज्यसभेची उमेदवारी यासह विविध विषयाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे पक्षाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार संजय जाधव हे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना पक्षात फुट पडली आणि बहुतांश नेते, खासदार, आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. खरेतर परभणीचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी जिल्ह्यात शिवसेना खासदार निवडून येणे ही जशी परंपरा आहे तशी निवडून आलेल्या खासदाराने पक्ष सोडणे ही सुद्धा परंपराच आहे. मात्र, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना जनतेने स्वीकारले नाही हा सुद्धा जिवंत इतिहास आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले.

खासदार संजय जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत हॅट्रीक साधत विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट, 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी, एमआयएमच्या प्रचारासमोर जाधव यांचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा आणि 2024 च्या निवडणुकीत मनोज जरांगे यांचे आंदोलन व विशेषतः मुस्लीम समाजाची मिळालेली मते या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांनी तिसरा विजय साकारला.

महाविकास आघाडीला मिळालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा प्रयोग पुढे संजय जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही केला. परभणी महापालिकेत शिवसेनेची सत्ता, महापौर आणि तो ही मुस्लिम देण्याचा चमत्कार यातूनच घडला. परभणीच्या राजकीय क्षेत्रात हा 360 कोनातून झालेला बदल अनेकांच्या पचनी पडला नाही. मुस्लीम समाजाचे 29 नगरसेवक विजयी झाल्यामुळे महापौर निवडीवर त्यांचाही मोठा प्रभाव होता.

कट्टर हिंदुत्व व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जाज्वल्य विचार ऐकून ऐन तारुण्यात शिवसैनिक बनलेल्या पिढीला हा बदल स्वीकारताना अवघडल्यासारखे झाले. त्यातच परभणीतील एका घटनेने भर पडली. परभणी महापालिकेने रात्रीतून मारोती मंदिर हटवले. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिका कार्यालयात आक्रमक आंदोलन, तोडफोडही केली.

या घटनेमुळे हिंदुत्ववादी मतदारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविषयी नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुस्लीम मते तर दुसरीकडे हिंदुत्व अशा दुहेरी कात्रीत पक्षाचे नेते सापडले आहेत. अशा परिस्थितीत संजय जाधव यांनी जर शिंदेंच्या पक्षात जाण्याचा निर्णय केला असेल तर तो त्यांच्या कडवट शिवसैनिकांच्या स्वभावास अनुसरूनच असेल.

महाविकास आघाडी सरकार असताना कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही म्हणून पक्षप्रमुखांना राजीनामा सोपवणे, औंढा येथील जाहीर सभेत पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करणे हे प्रसंग जाधव यांच्यातील कडवट शिवसैनिक जीवंत असल्याचे द्योतक आहे. त्यामुळे पक्षाची भविष्यकालीन वाटचाल, आक्रमक हिंदुत्व व विरोधी पक्षात असण्याच्या मर्यादा, लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना या सर्व मुद्द्याचा विचार करूनच पक्षाच्या बैठकीतील अनुपस्थिती व त्यातून दिलेला संदेश स्पष्ट आहे. त्यामुळे ही फक्त एका अनुपस्थितीची गोष्ट आहे की पक्षाला जय महाराष्ट्र? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT