Mahadev Jankar-Sharad Pawar-Dhairsheel Mohite Patil
Mahadev Jankar-Sharad Pawar-Dhairsheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Jankars 'U Turn : महादेव जानकरांचा ‘यू टर्न’ मोहिते पाटलांच्या पथ्यावर पडणार?

भारत नागणे

Pandharpur, 24 March : महाविकास आघाडीसोबत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची भाषा करणारे महादेव जानकर यांनी आज अचानक यू टर्न घेत महायुतीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपुढे पर्यायाने शरद पवारांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. आता पवार त्यातून कोणता मार्ग निवडतात, हे पाहावे लागेल. जानकरांचा ‘यू टर्न’ माढ्यात मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करुन एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करताच मोहिते पाटलांनी विरोधाचे हत्यार उपसले. सध्या मोहिते पाटील कुटुंबातील अनेक सदस्य माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने मागील पाच वर्षातील विकास कामांचा चढता आलेख पाहूनच विद्यामान खासदार निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निंबाळकरांनी मतदार संघात गाठीभेटी आणि दौरे सुरु केले आहेत. मतदार संघातील सहापैकी शहाजी पाटील, बबन शिंदे, संजय शिंदे, राम सातपुते, जयकुमार गोरे या पाच आमदारांनी निंबाळकरांच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकले आहे. मात्र, वास्तव परिस्थितीही दुर्लक्षित करून चालणार नाही.

रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetshinh Naik Nimbalkar) उमेदवारी दिल्याने भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. रविवारी (ता. 24 मार्च) भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. भेटीदरम्यान माढ्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. भेटीत नेमकी काय? चर्चा झाली याचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही. मात्र सकारात्मक निर्णयाची भाजपला आशा आहे. तसेच, फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचीही नाराजी दूर होईल, असे भाजप नेत्यांचा आशावाद आहे.

महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवार यांनी निंबाळकरांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याची तयारी चालवली होती. माढा मतदारसंघातील सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन पवारांनी रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev jankar) यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली होती. जानकर यांनीही शनिवारी शरद पवार आणि रामराजे यांचीही भेट घेऊन मदतीची विनंती केली होती. मात्र, त्यांच्या नावाला माढ्यातील पवार गटाच्या काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा आज रंगली होती.

जानकर यांना माढा देऊन बारामती सेफ करण्याचा पवारांचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी आज उलटवून लावला. जानकर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपण महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे पवारांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे माढ्यातून आता कोणाला उमेदवारी द्यायाची, याचा पेच आता पवारांपुढे असणार आहे.

दरम्यान, अभयसिंह जगताप, माढ्याचे राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर, शेकापचे डाॅ. अनिकेत देशमुख, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आता सुरु झाली आहे. मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील का? या विषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. तसेच, पवारही मोहिते पाटील यांना उमेदवारी देणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पवारांपुढे आता तुल्यबळ पर्यायही उपलब्ध नाही, त्यामुळे जानकर यांचा निर्णय मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडणार का, याची चर्चा आता रंगला आहे.

मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

माढा लोकसभेसाठी भाजपकडून इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे जरी मतदारसंघात फिरत असले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. धैर्यशील मोहिते पाटील हे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील गावांना भेटी देवून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत. परंतु राजकीय भूमिका काय घेतली जाणार, हे मात्र त्यांच्याकडून सांगितले जात नाही. मोहिते पाटलांची भूमिका ठरत नसल्याने महाविकास आघाडीची उमेदवारीचा निर्णय लांबवणीवर पडत आहे, त्यामुळेच मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT