Hatkanangle Lok Sabha Constituency's Leader  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : हातकणंगले लोकसभेला जमलेली गट्टी विधानसभेला टिकणार? की राजकीय स्फोट अन बंडखोरी अटळ?

Hatkanangale Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीत असणारे पारंपरिक विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ मैदानात दिसले. त्याला राज्यातील सत्ताकारण कारणीभूत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 14 May : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातील जोडण्या राज्यात लक्षवेधी ठरल्या. महाविकास आघाडी आणि महायुतीत असणारे पारंपरिक विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ मैदानात दिसले. त्याला राज्यातील सत्ताकारण कारणीभूत आहे. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी अंतर्गत विरोध झाला असला तरी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही मतदारसंघात घातलेले लक्ष पाहता तो विरोध मवाळ झालेला दिसला. पण खरी अडचण आगामी विधानसभा निवडणुकीत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिलेदार बंडाच्या तयारीत असणार, हे नक्की.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास भाजपचे सहयोगी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारात आघाडी घेतली. त्यांना काँग्रेसचे करणसिंह गायकवाड यांची साथ मिळाली. स्थानिक राजकरणामुळे त्यांनी आमदार कोरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा बँकेत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासोबत असणारे रणवीरसिंह गायकवाड हे स्थानिक राजकारणामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासोबत राहिले. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे, करणसिंह गायकवाड, रणवीरसिंह गायकवाड हे इच्छुक असतील. पण लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांचा निकाल महत्वाचा आहे. त्यावर शाहूवाडी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अवलंबून आहेत. पाटील यांच्या विजय झाल्यास कोरे विरुद्ध रणवीरसिंह गायकवाड अशी लढत होण्याचे संकेत आहेत. जर पराभव झाल्यास पाटील विरुद्ध कोरे ही लढत होईल.

हातकणंगले विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची खरी अडचण असणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुजीत मिणचेकर (Sujit Minchekar), राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव आवळे आणि काँग्रेसचे विद्यमान राजू आवळे यांनी सत्यजित पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली. पण, विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती पाहता हे तिघेही इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदार संघात राजकीय स्फोटसोबत बंडखोरी अटळ मानली जात आहे. महायुतीकडून सध्या अशोकराव माने यांनी खिंड लढवल्याने त्याच्या मार्गात अडथळा निर्माण होईल, असे वाटत नाही.

शिरोळ विधानसभा मतदारसंघात आमदार आणि शिंदे गटाचे सहयोगी राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, भाजपचे माधवराव घाटगे यांनी महायुतीकडून, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे आघाडीवर होते. सध्या या मतदार संघात आमदार यड्रावकर यांची चर्चा अधिक आहे. तर महाविकास आघाडीत गणपतराव पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यातच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दोन्ही आघाडीचा स्वतंत्र लढण्याचा विचार झाल्यास या मतदार संघातील लढत लक्ष्यवेधी ठरेल, असा अंदाज आहे.

इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर आणि भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्यात रस्सीखेच असणार आहे. आमदार आवडे भाजपकडून उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. पण तसे न झाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे मदन कारंडे, काॅंग्रेसचे राहुल खंजिरे, संजय कांबळे, संजय तेलनाडे हे प्रमुख चर्चेत आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदार सघात महाविकास आघाडीची डोकेदुखी अधिक आहे. जर राज्यात महाविकास आणि महायुतीतले पक्ष स्वतंत्र लढले तर लोकसभेत झालेली दिलजमाई विधानसभेत टिकणे अवघड आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT