Sujay Vikhe Patil-Vikram Rathod Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Politics : राठोडांची विखेंवर जहरी टीका; 'नगर दक्षिणचं दिवाळं काढणाऱ्यांना जनता लोकसभेला चोख हिशेब देईल'

Pradeep Pendhare

Nagar News : भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखेंवर युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी जोरदार टीका केली आहे. काॅंग्रेसने निशाणा साधल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विक्रम राठोड यांनीही टीकेचा टायमिंग साधले आहे. ‘नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे दिवाळं काढल्यानंतर तुम्ही आम्हाला 30 वर्षे विकासाचा हिशेब मागता? अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली भयमुक्त जीवन जगलेले नगरकर आता खून, ताबेमारी, राजकीय साठमारीमुळे बदनाम झाले आहेत. हे कोणामुळे झाले हे सर्वश्रुत आहे आणि तुम्ही त्यांच्याच संगतीला जाऊन बसले आहात', अशी कडवट टीका राठोड यांनी केली आहे. (Vikram Rathod's sharp reply to MP Sujay Vikhe)

विखे पिता-पुत्रांनी उत्तर नगर जिल्ह्यात साखर वाटून साजरी केलेली दिवाळी यावरही राठोड यांनी टीका केली. खासदार सुजय विखे यांनी नाव न घेता शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीचा हिशेब मागितला. त्याला राठोड यांनी सणसणीत उत्तर दिले. राठोड म्हणाले की, खासदार विखेंनी उत्तर नगर जिल्ह्यात साखर वाटून दिवाळी साजरी केली. यावर खुलासा करताना 22 जानेवारीला राम मंदिर खुले होणार असून, त्यावेळी नगर दक्षिणेत दिवाळी साजरी करू, असे म्हणतात. नगर दक्षिणेचं यांनी अगोदरच दिवाळंच काढलं आहे. नगर आता खून, ताबेमारी, राजकीय साठमारीमुळे बदनाम झाले आहे. खासदारांचे सरकारी जागा हडपण्याचे, ताबेमारीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे ही ताबेमारी थांबवा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर शहरातील उड्डाणपूल असो की, सीना नदीवरील पूल, दोन्ही पुलाला भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी व दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रयत्नातून पूर्वीच मंजुरी मिळाली आहे. पण, आज तुम्ही फक्त उद्‌घाटन करून आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहात. तुम्हाला नगर दक्षिणमधून जेव्हा निवडणूक लढवायची होती, तेव्हा तुम्हीही भयमुक्त नगरचा नारा दिला होता. दहशत, गुंडगिरीचे उगमस्थान असलेल्या केडगावला बंगला घेऊन स्थायिक होण्याचा तुम्ही नगरकरांना शब्द दिला होता.

निवडून येण्यासाठी नगर शहराने आपल्याला खासदारकीच्या निवडणुकीत मताधिक्य द्यावे, म्हणून तुम्ही अनिल राठोड यांचे पाय धरण्यासाठी किती वेळा शिवालयाचे उंबरे झिजवले? हे सर्व नगरकर आणि शिवसैनिकांना माहीत आहे. आता तुम्ही राठोड यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीचा हिशेब मागताय? याचा हिशेब तुम्हाला अनिल राठोडांवर प्रेम करणारे हजारो नगरकर येत्या 2024 च्या निवडणुकीत नक्कीच देतील, असेही विक्रम राठोड यांनी म्हटले आहे.

‘आयुर्वेद’मधून येते खासदारांना स्क्रिप्ट

मी अनिल राठोडांचा मुलगा आहे. मला सत्य बोलण्याची शक्ती, बुद्धी आणि हिंमत आई-वडिलांच्या संस्कारातून मिळाली आहे. मला कुठलीही स्क्रिप्ट वाचण्याची गरज नाही. मात्र, तुम्ही जे बोलताय त्याची स्क्रिप्ट 'आयुर्वेद'वरून लिहिली जातेय का? असा प्रश्न संपूर्ण नगरकरांना पडला आहे. नगर शहरासाठी, दक्षिण नगर जिल्ह्यासाठी तुम्ही काय केले? उलट शहरात सध्या जनसेवा फाउंडेशन आणि विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली सरकारी जागा हडप करण्याचा सपाटा तुम्ही लावला आहे. सावेडीतील व्यापारी संकुलाची जागा मनपाकडून आरोग्य केंद्र चालविण्याच्या नावाखाली ताब्यात घेतली. आता त्याच इमारतीतील प्रमोद महाजन स्मृती वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्राच्या जागेवर आपला डोळा आहे.

मेडिकलच्या यादीतून नगरचे नाव कोणी वगळले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीतून ऑनलाइन उद्‌घाटन झालेले कोट्यवधी रुपयांचे 100 खाटांचे आयुष रुग्णालय कर्मचाऱ्यांविना धूळखात पडून आहे. त्याच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नगर शहरात आले असते, तरी नगरचे किमान रस्ते सुधारले असते. या आयुष रुग्णालयाची नगरकरांना काय गरज होती? त्यापेक्षा नगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आपल्या विळद घाटातल्या विखे पाटील फाउंडेशनच्या खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशावर आणि व्यवसायावर त्याचा परिणाम होईल म्हणून की काय राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली. त्या यादीतून नगरचे नाव वगळण्याची सूचना कोणी केली? याचा शोध नगरकर निवडणुकीत निश्चित घेतील.

पाणीपट्टीवरून मनपा आयुक्तांवर दबाव कोणी आणला?

केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला सैनिक स्कूल दिले. त्यात राज्यात दरवेळी प्रवरा पब्लिक स्कूलचाच नंबर का लागतो? सैनिक स्कूल लोणीऐवजी विळद घाटात का सुरू करीत नाहीत? असा सवाल विक्रम राठोड यांनी विचारला. मनपा आयुक्तांवर शाई आणि बूट फेकण्याचा विषय तुम्ही काढता, मग विळद घाटातील आपल्या संस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुळा धरणातून येणाऱ्या मुख्य पाइपलाइनला किती टॅब तुम्ही बेकायदेशीरपणे मारून नगरचा पाणीपुरवठा विस्कळीत केला.

केंद्राची अमृत योजना नगरचा पाणीप्रश्न संपविण्यासाठी नव्हतीच, तर विळद घाटातील विखे पाटील फाउंडेशनच्या प्रकल्पांच्या टाक्या भरण्यासाठी होती. अशा अविर्भावात आपण वागत आहात, हे नगरकरांपासून लपलेले नाही. या प्रकल्पांची थकलेली चार ते पाच कोटी रुपयांची पाणीपट्टी कवडीमोल आकारण्यासाठी मनपा आयुक्तांवर आपल्या यंत्रणेमार्फत आणलेला दबाव लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

खासदारांना पराजयाचा साक्षात्कार घडणार

खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्याविरोधात दोन हात केले, त्यांनाच सोबत घेऊन तुम्ही विकासकामांच्या नावाखाली येणाऱ्या टक्केवारीतील रबडी आपसांत वाटून घेत आहात. तुम्हीच त्यांना घाबरून त्यांच्या सोबत व्यासपीठ शेअर करीत आहात. आपल्या परवानगीशिवाय नगरच्या पुलापर्यंत यायचे नाही, हा ‘आयुर्वेद’चा आदेश शिरसावंद्य मानून तुम्ही त्यांना सोबत घेतल्याशिवाय एकही कार्यक्रम करू शकत नाही. मग खरे दहशतीखाली कोण आहे? हे नगरची जनता जाणते. नगरकर या कृत्यापासून अनभिज्ञ आहेत, असे समजू नका. येणाऱ्या निवडणुकीत खासदारांना पराजयाचा साक्षात्कार नगरची जनता आणि शिवसैनिक घडवतील, असा हल्लाबोल राठोड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT