Mumbai News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (३ मार्च) सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवसापासून महाविकास आघाडीने सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. महाविकास आघाडीने अधिवेशन काळात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच गेल्या दोन दिवसापासून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बैठका घेत प्लॅन ठरवला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, परभणी येथील जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे गेल्या तीन महिन्यापासून राज्य सरकार बॅकफुटला गेले आहे. त्यातच मंत्री धनंजय मुंडे, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या हाती सरकारला घेरण्याची संधी चालून आली आहे.
महायुती (Mahayuti) सरकार आणि महाविकासआघाडी यांच्यात निर्माण झालेले टोकाचे वितुष्ट लक्षात घेता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रत्येक दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीकडे मोठे बहुमत आहे तर विरोधकांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात उंचवावा लागणार आहे.
गेल्या अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारला घेरण्याच्या जोशात विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन झाले होते. त्यामुळे या अधिवेशनात महाविकासआघाडीला काळजी घ्यावी लागणार आहे. विरोधी पक्षाला आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना अडचणीत आणण्याचे विरोधी पक्षाचे धोरण आहे.
या अधिवेशन काळात महायुती सरकारला सळो की पळो करून सोडायचे आहे, पण हे करताना आपलं निलंबन होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. यावेळी संसदीय कामकाजाची सर्व आयुधं वापरत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची स्टॅटर्जी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आखली आहे.
अधिवेशन काळात विरोधकांकडे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणावरून घेरण्याची नामी संधी आहे. गेल्या तीन महिन्यापासून सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तियांचा सहभाग असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशनात याच मागणीवरून विरोधकांनी महायुती सरकारला जेरीस आणले होते. त्यामुळे आता येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांना थोपविताना सत्ताधाऱ्यांचा कस लागणार आहे.
परभणी येथील जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला. या युवकाचे मृत्यूप्रकरण चांगेलच गाजले आहे. या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसापासून विरोधकांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडून देण्यास दिरंगाई केली जात असल्याने या प्रश्नावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारसमोरील अडचणीत भरच पडली आहे.
त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच एका न्यायालयीन प्रकरणात अडकल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुनील केदारला एक न्याय तर कोकाटे यांना दुसराच न्याय दिला जात असल्याचे म्हणत राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. या सर्व मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरण्याची संधी महाविकास आघाडीकडे चालून आली आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदारांची बैठक घेतली. यावेळी अधिवेशन काळात कोणते विषय आमदारांनी मांडायचे? राज्यातील सामान्यांचे प्रश्न याशिवाय गाजत असलेले विषय मांडून सरकारला घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरविण्यात आली. या अधिवेशनावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर महाविकास आघाडीकडून दावा केला जाणार आहे.
हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विचार केला जाऊ शकतो. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्या संदर्भात नाव या अधिवेशन काळात दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.