Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या मैदानात 'या' वाघिणी फोडताहेत पुरुष प्रतिस्पर्ध्यांना घाम!

अय्यूब कादरी

Political News : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर अद्याप महिला विराजमान झालेली नाही. राज्याच्या राजकारणात पुरुषांचाचा बोलबाला असतो. असे असतानाही राजकारणातील काही जिगरबाज महिलांनी आपले अस्तित्व ठळकपणे टिकवून ठेवलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काही मतदारसंघांत या महिला प्राण पणाला लावून लढत आहेत. काही ठिकाणी त्यांची लढत नात्यांतील पुरुषांशीच होत आहे.

या महिलांमध्ये प्रामुख्याने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (सोलापूर) आणि प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर), भाजपच्या पंकजा मुंडे (बीड), डॉ. भारती पवार (दिंडोरी), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा पवार गट) अर्चनाताई पाटील (उस्मानाबाद), शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे (कल्याण) यांचा समावेश आहे. या महिला आपापल्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी टक्कर देत आहेत.

उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात अर्चनाताई पाटील यांची लढत त्यांचे चुलत दीर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी होत आहे. कल्याण मतदारसंघातही हाय व्होल्टेज लढत होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वैशाली दरेकर-राणे यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे. या सर्व लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रणिती शिंदे (काँग्रेस, सोलापूर मतदारसंघ) -

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झाल्या आहेत, मोदी लाट आणि मुस्लिम मते मोठ्या संख्येने एमआयएम उमेदवाराच्या पारड्यात पडत असतानाच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही प्रणिती विजयी झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुकांत त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली आहे.

अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी त्या निवडणुका जिंकल्या होत्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे सलग दोनवेळा पराभूत झाले आहेत. शिंदे यांना पराभूत करून विजयी झालेले भाजपचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले. भाजपने सलग तिसऱ्या निवडणुकीत उमेदवार बदलला आहे. आता माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्याशी प्रणिती शिंदे यांची लढत होणार आहे.

राम सातपुते (Ram Satpute) यांची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या नावे एक पत्र जारी करून बोलताना काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे मतदारसंघात एक वेगळा संदेश गेला. प्रणिती यांचा पहिलाच वार सातपुते यांच्या जिव्हारी लागला. राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत, हे नॅरेटिव्ह सेट करण्यातही प्रणिती यांनी यश मिळवले. प्रचारादरम्यान राम सातपुते आणि प्रणिती शिंदे समोरासमोर आले.

त्यावेळी सातपुते आणि कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाहून घोषणाबाजी सुरू केली. प्रणिती या एक महिला म्हणून या उन्मादालाही शांतपणे सामोरे गेल्या. सोलापूरच्या विकासाचे मुद्दे ते प्रचारात उपस्थित करत आहेत. पायाला भिंगरी लावून त्या मतदारसंघात फिरत आहेत. वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे (भाजप, बीड मतदारसंघ)-

माजी उपमुख्यमंत्री, भाजपचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मध्यंतरीची काही वर्षे राजकीय विजनवास सहन करावा लागला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारल्या गेल्या. भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अन्य पक्षांतील अनेक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांचे पुनर्वसन केले, मात्र पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. भाजपने आता त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे आहेत.

गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फायदा पंकजा मुंडे यांना निश्चितपणे होऊ शकतो. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवार यांच्या गोटात आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांपैकी बीड हाही एक आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने पंकजा यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली होती. त्या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणेच होते. त्यावेळी पराभूत झाले असले तरी सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार मते मिळाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव केलेले त्यांचे चुलतबंधू, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आता त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पंकजा यांना बळ मिळाले आहे.

अर्चनाताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, उस्मानाबाद)-

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसेच्या (अजितदादा पवार गट) अर्चनाताई पाटील या रिंगणात उतरल्या आहेत. अर्चनाताई या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे केलेल्या अर्चनाताई या आक्रमक राजकारणासाठी ओळखल्या जातात. पती भाजपमध्ये आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी टीका त्यांच्यावर झाली, मात्र त्यांनी ती आता मोडीत काढली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार, त्यांचे चुलत दीर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या आक्रमक वक्तृत्वशैलीला आर्चनाताई आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील हे तोडीस तोड उत्तर देत आहेत.

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते आहेत. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार आदी जिल्ह्यातील महत्वाचे नेते आता महायुतीत आहेत. त्यामुळे अर्चनाताई पाटील यांना बळ मिळाले आहे. सतत लोकांमध्ये राहणारा, लोकांचे फोन उचलणारा खासदार, असे नॅरेटिव्ह ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तयार केले आहे.

खासदारकीच्या काळात कोणती विकासकामे केली, किती निधी आणला, असे प्रश्न उपस्थित करून अर्चनाताई यांनी ते नॅरेटिव्ह मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पती आणि मुलाची या लढाईत त्यांना मोलाची साथ मिळत आहे. अर्चनाताई यांचे सासरे, राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अर्चनाताई यांनी सुरू केला आहे.

वैशाली दरेकर-राणे (शिवसेना ठाकरे गट, कल्याण मतदारसंघ)-

कल्याण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी दोन हात करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर-राणे या सज्ज झाल्या आहेत. आक्रमक आणि अभ्यासू नेत्या अशी वैशाली दरेकर यांची ओळख आहे. हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरलेले शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाकडून अनेक नावे चर्चेत आली होती, मात्र वैशाली दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे 40 आमदारांसह बाहेर पडले. त्यानंतर वैशाली दरेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आक्रमकपणे टीका केली होती. दरेकर या गेल्या १९ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. 2005 मध्ये त्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका ठरल्या होत्या.

शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती असली तरी वैशाली दरेकर यांची लढाई सोपी नाही. श्रीकांत शिंदे हे सलग दोनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांचे वडील मुख्यमंत्री आहेत. अर्थात त्यांच्या दिमतीला मोठी यंत्रणा आहे. असे असतानाही वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरून त्यांच्या विरोधात लढण्याचे धाडस दाखवले आहे. मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता.

राज ठाकरे Raj Thackeray यांनी 2009 मध्ये त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना एक लाख 63 हजार मते मिळाली होती. असे असले तरी लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पदरी पडला. 2018 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी टाकली आहे. वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

डॉ. भारती पवार (भाजप, दिंडोरी मतदारसंघ)-

राज्यातील दहा जिल्ह्यांत कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते, त्यात दिंडोरीचा समावेश आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 80 टक्के क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या निवडून आल्या होत्या. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि भारती पवार यांची कोंडी झाली. भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातच मंत्रिपद मिळाल आहे. त्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला होता.

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांचे डॉ. भारती पवार यांच्यासमोर आव्हान आहे. उमेदवारी जाहीर होताच कांदा निर्यातबंदी आणि मतदारसंघातील आरोग्याच्या सुविधांवरून भगरे यांनी डॉ. भारती पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आरोग्याच्या सुविधांबाबत डॉ. भारती पवार यांनी भगरे यांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. केंद्रातील सध्याचे सरकार हे कांद्याला अनुदार देणारे पहिले सरकार आहे, असे उत्तरही त्यांनी दिले. असे असले तरी कांदा निर्यातबिंदीमुळे डॉ. भारती पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर ते कशी मात करतात, हे महत्वाचे ठरणार आहे. अनाठायी भीती, अर्धवट माहितीच्या आधारे केंद्राने कांदा निर्यातबंदी केली आणि त्याच्या झळा आता डॉ. भारती पवार यांना सहन कराव्या लागत आहेत. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या भगरे यांनी पवार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्याला त्या कशा सामारे जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिभा धानोरकर (काँग्रेस, चंद्रपूर मतदारसंघ)

राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक लढत चंद्रपूर मतदारसंघात होत आहे. राज्याचे कबिनेट मंत्री, भाजपचे मातब्बर नेते यांच्यासमोर काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे गेल्यावर्षी अकाली निधन झाले. प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्रीही आहेत. दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांची लोकप्रियता मोठी होती. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचीही ताकद मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपूर मतदारसंघात घ्यावी लागली, यावरूनच प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे, याची प्रचिती येते.

1989 आणि 1991 अशा लोकसभेच्या दोन निवडणुका मुनगंटीवार यांनी या मतदारसंघातून लढवल्या होत्या, मात्र त्यात त्यांना अपयश आले. आता ते तिसऱ्यांदा लोकसभेसाठी चंद्रपूर मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. सुरेश धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते हंसराज अहीर यांना पराभवाची धूळ चारली होती. या य़शाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रतिभा धानोरकर सज्ज झाल्या आहेत. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि सुधीर मुनगंटीवार हे दोन्ही उमेदवार सर्वार्थाने प्रबळ आहेत. पती सुरेश धानोरकर यांच्या निधनामुळे प्रतिभा धानोरकर यांना या मतदारसंघात सहानुभूती आहे. याशिवाय त्या आक्रमक प्रचार, टीकाही आक्रमकपणे करत आहेत. मुनगंटीवार यांच्या प्राचारार्थ पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. मात्र या सभेमुळे काहीही फरक पडणार नाही, अशी टीका करत प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांना घाम फोडला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT