Maharashtra Assembly Election Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Assembly Election: मुंबईतील मतविभागणीचा फटका मविआला का महायुतीला? कुठले मुद्दे ठरणार निर्णायक

Mumbai Assembly Election : मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मनसे, एमआयएम, वंचित आघाडी व इतर पक्षामुळे मराठी मते, मुस्लिम व दलित मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभेच्या मतदानासाठी शेवटचा आठ-दहा दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असताना निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने जोर लावला असली तरी या निवडणुकीत मनसे, एमआयएम, वंचित आघाडी व इतर छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले आहेत, त्यामुळे चुरस वाढली आहे.

विशेषतः मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मनसे, एमआयएम, वंचित आघाडी व इतर पक्षामुळे मराठी मते, मुस्लिम व दलित मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होणार आहे. त्यामुळे या मुंबईतील मतविभागणीचा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. सत्ता काबीज करण्यासाठी या 36 जागांवरील कल निर्णायक ठरणार असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात असली तरी प्रत्येक मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत. त्याशिवाय त्या भागातील जातीय समीकरणे वेगवेगळी असल्याने त्या सर्व बाबीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.

यावेळेला मनसेनेही मुंबईत मोठ्या संख्येने उमेदवार दिल्याने भाजप (Bjp), दोन शिवसेना आणि मनसे यांच्यातील रणसंग्राम अनुभवण्यास मिळणार आहे. मुंबईतील बहुतांश मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी चार जागी महाविकास आघाडीने विजय मिळवला होता. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला ३ जागा तर काँग्रेसला एक जागी विजय मिळवला होता. तर महायुतीला दोन जागी यश मिळाले होते. त्या पैकी एक ठिकाणी भाजपला तर एक ठिकणी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचा उमेदवार अवघ्या 48 मताने निवडून आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत याठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली होती.

विधानसभेच्या 2019च्या निकालांवर एक नजर टाकल्यास मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी भाजपने 16 मतदारसंघ तर एकसंध असलेल्या शिवसेनेने 14 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. शिवसेनेतील फुटीनंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे यातील आठ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सहा आमदार आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी चित्र थोडेसे वेगळे होते. त्यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नव्हती. त्यामुळे मराठी मताची मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाली नव्हती. मात्र, आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे काही मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे मराठी मतामध्ये मतविभागणी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मते कोणाच्या पारड्यात पडणार यावर याठिकाणचे यश-अपयश अवलंबून असणार आहे.

मुंबईत मनसेसोबतच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच मतदारानी महाविकास आघाडी अथवा महायुती या दोन मोठ्या पक्षाच्या पारड्यात मते टाकली होती. त्यामुळे या छोट्या पक्षाचा प्रभाव लोकसभा निवडणुकित जाणवला नव्हता. विशेषतः मुंबईतील मुस्लिम व दलित व्होटबँक महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिले असल्याचे चित्र होते. मात्र, यावेळेस एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमुळे मत विभागणी झाली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती बॅकफूटला गेली असल्याचे चित्र पहायवास मिळत होते. मात्र, त्यानंतर महायुतीने कमबॅक केले आहे. विशेषतः गेल्या काही दिवसात महायुतीने प्रचारातही मोठी आघाडी घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून महायुती थोडीशी सावरली आहे.

विशेषता त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शेतकरी, महिला, युवकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्याचे ठरवले होते. त्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचे दिसत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विभागावर मोठे मेळावे घेत राज्यभर वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी झाले आहेत. विशेषता या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेची जाहिरातबाजी केली आहे. त्याशिवाय लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेचा प्रचार व प्रसार जोरात केला आहे.

विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचा फायदा त्यांनी प्रचारासाठी करून घेतला आहे. विशेष त्यासाठीचे ब्रँडिंग मोठ्या प्रमाणात केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाने एकत्रित येत राज्यभर मेळावे घेत शक्तिप्रदर्शन केले. त्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. विशेषता गेल्या काही दिवसातील टीव्ही, रेडिओ व वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डिंग केले आहे.

मुंबईतील लोकसभा निवडणुकीचा निकाल पहिला तर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची मोठी ताकद असल्याचे पुढे आले आहे. त्यावेळी मराठी मताची मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली नव्हती तर मुस्लिम व दलित समाजाची मते आघाडीच्या बाजूने राहिली होती. त्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. गेल्या चार ते पाच महिन्यात बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. त्यामुळे त्याचे पडसाद आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत पडणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणे खूप महत्त्वाची ठरली होती. विधानसभा निवडणुकीत मनसे, एमआयएम व बहुजन आघाडी उतरली आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागात मराठी मते मोठ्या प्रमाणात आहेत तर काही भागात मुस्लिम व दलित मते निर्णायक ठरू शकतात. शिवडी विधानसभा मतदारसंघात मराठी मताची विभागणी मनसे व महाविकास आघाडीत हॊणार आहे. याठिकाणी महायुतीचा उमेदवार नसल्याचा फायदा मनसेला होणार आहे. तर दुसरीकडे मुस्लिम व दलित मते आघाडीच्या बाजूने जाणार आहेत.

या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसे फॅक्टर कसा चालणार यावरून बरेचसे काही अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागलेले आहे. मनसेमुळे जर मराठी मताचे ध्रुवीकरण झाले तर निश्चितच त्याचा तोटा महायुती व महाविकास आघाडीला होणार आहे. मनसेमुळे मराठी मताचे ध्रुवीकरण झाले तर तर ती जाणारी मते महायुतीची असणार की महाविकास आघाडीची मते त्यांच्या पारड्यात जाणार यावरून कोणाचा फायदा होणार आहे हे समजून येईल.

दुसरीकडे दलित आणि मुस्लिम मते महाविकास आघाडीच्या पारड्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे गेले तर ते महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरणार आहेत. मात्र, या मतांमध्ये जर पुन्हा एमआयएम व वंचीत बहुजन आघाडीमुळे विभागणी झाली तर महाविकास आघाडीला याचा फटका बसणार आहे.

विशेषता जनसामान्यात लाडकी बहिणी योजना व राज्य सरकारच्या वतीने राबवलेल्या विविध योजनेला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना महिना तीन हजार रुपये व बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना व मुला-मुलींना मोफत शिक्षण योजना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोणत्या योजनेला नागरिक प्रतिसाद देतात यावर यश अपयश अवलंबून असणार आहे.

मुंबईतील स्पर्धा निश्चितच तुल्यबळ असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळेस मतदाराचा कल एका बाजूने दिसत नाही. तर मतदाराचा कल या निवडणुकीत दोन्हीकडून झुकलेला दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ? हे पाहण्यासाठी २३ नोव्हेंबरची म्हणजेच मतमोजणीची वाट पहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT