Raj Thackeray & Uddhav Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

MNS ShivSena alliance: मनसे-शिवसेना युती? आदित्य ठाकरेंचा पुढाकार! राज ठाकरेंची भूमिका ठरणार निर्णायक

Aditya Thackeray political move News : महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : महिनाभरापूर्वीच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलखतीमध्ये येत्या काळात महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेशी युती करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लगेचच प्रतिसाद देत एकत्र येण्याची तयारी दर्शवली होती. एकत्र येण्याबाबत दोघांनीही सूचक विधान केल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात यावर चर्चा रंगली होती. त्यानंतर ठाकरे बंधू सुट्ट्यासाठी परदेशात गेले. त्यामुळे गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीविषयीची चर्चा थंडावली होती.

त्यातच आता ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेसोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावर विधान केले आहे. आदित्य ठाकरेंना राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

मनसे आणि शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांची मुळे एकच आहेत. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर दोन्ही पक्ष चालतात. शिवसेनेत असताना राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत 2006 मध्ये राज ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला. शिवसेनेबाहेर पडून त्यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कटुता, टोकाची टीका आणि एकमेकांशी स्पर्धा सुरूच राहिली. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थतीत विशेषतः उद्धव ठाकरे गटाला बसलेल्या गटबाजीच्या धक्क्यांनंतर नवीन सहकार्याचा विचार करावा लागत आहे.

गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कारकिर्दीत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. त्यामुळे मनसे-शिवसेना युती ही दोन्ही पक्षांच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाची ठरू शकणार आहे. विशेषतः आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये त्याचा दोन्ही पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता आदित्य ठाकरे यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा संवादाचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे गटाने युतीच्या दृष्टीने एक सकारात्मक राजकीय पाऊल टाकले असल्याचे मानले जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. सेटिंगचे राजकारण करणार नाही. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आता काका राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी देखील पुढे पाऊल टाकल्याची चर्चा रंगली आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसात थंड पडलेला हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या युतीच्या चर्चेत राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण त्यांनी अद्याप कोणतीच स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तर येत्या काळात भाजप आणि शिंदे गटासमोरील अडचणी वाढणार आहेत. ही युती त्यांच्यासमोर एक आव्हान ठरू शकते, विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये त्या बाबतची चर्चा जोरात सुरु आहे.

संभाव्य राजकीय परिणाम

महापालिका निवडणुकीपूर्वी जर ठाकरे बंधूंची युती झाली, तर ती मराठी मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करू शकते. मनसेच्या व्यासपीठावरून होणारा प्रखर मराठी मुद्द्यांवरील आवाज आणि उद्धव ठाकरे गटाची भावनिक आपुलकीची ओळख या दोहोंचा संगम विरोधकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळेच महायुतीपुढे या निमित्ताने आव्हान उभे टाकणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेणार? यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे.

राज ठाकरेंची निर्णायक भूमिका

राज ठाकरे हे कायमच स्वतंत्र आणि ठाम मत मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजपशी वेळोवेळी जवळीक साधली असली, तरी सध्या ते कोणत्याही युतीबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. जर त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली, तर ती केवळ राजकीय नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही मोठी घटना ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT