Mumbai News: गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ हे सातत्याने चर्चेत असतात. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली होती. नंतर त्यांची सुटका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादा पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेच्या विरोधातच नाशिक मतदारसंघातून शस्त्रं परजली होती. आता एका ताज्या प्रकरणानं त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ईडीपासून सुटका करून घ्यायची असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात निर्माण झाली होती, असं भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या '2024 दी इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे.
भुजबळ हे यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले होते. शिवसेनेतून बाहेर पडणं, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न आदी प्रकरणांमुळेही भुजबळ चर्चेत आले होते.
अनेक नेत्यांनी यापूर्वी शिवसेना सोडली होती. शिवसेना सोडलेल्या बहुतांश नेत्यांची कारकीर्द संपुष्टात तर आली किंवा कारकीर्दीला ब्रेक तरी लागला होता. गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली फूट ऐतिहासिक ठरली आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शिवसेनेतून बाहेर पडणारे पहिले मोठे नेते ठरले होते. शिवसेना सोडल्यानंतर त्यांना शिवसैनिकांचा रोष पत्करावा लागला होता. त्यामुळे काही काळ ते भूमिगत झाले होते. या काळात त्यांना शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, तत्कालीन मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपल्या बंगल्यात आश्रय दिला होता.
भुजबळ यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या 12 आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी डॉ. पाटील यांनी घेतली होती. शिवसेना सोडल्यानंतर सामोरे गेलेल्या पहिल्या निवडणुकीत भुजबळांना पराभवाची चव चाखावी लागली होती.
शिवसेना त्यावेळी प्रचंड आक्रमक होती. शिवसेना सोडून अन्य पक्षात जाणाऱ्या नेत्याचा उल्लेख गद्दार असा केला जायचा. अशा नेत्याला पाडण्यासाठी शिवसैनिक पेटून उठायचे. याचा अनुभव शिवसेना सोडलेल्या नारायण राणे यांनाही आलेला आहे.
शिवसेना सोडल्यानंतर राणे यांनी लढवलेल्या विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. भुजबळ यांच्यासोबत बाहेर पडलेल्या 12 पैकी कृष्णराव इंगळे वगळता अन्य सर्व आमदार त्यानंतरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते.
छगन भुजबळ हे 1991 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवार यांना महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या.
मंडल आयोग लागू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं होतं. मंडल आयोग लागू करण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि भाजपनं कडाडून विरोध केला होता. त्यामुळे भुजबळ यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद निर्माण झाले होते, असं सांगितलं जातं. यातूनच भुजबळ यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता.
हे एक कारण दिलं जात असलं तरी विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याची खदखद छगन भुजबळ यांच्या मनात होती, असंही राजकीय क्षेत्रातील आणि शिवसेनेतील जाणकार लोक सांगतात. 1990 च्या निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून मनोहर जोशी यांची निवड केली होती. हे पद आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा असलेले भुजबळ त्यामुळे नाराज झाले होते. त्यांना शिवसेना सोडायची होती, त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या मंडल आयोगाला विरोधाचं कारण दिलं होतं.
भुजबळ एकटेच बाहेर पडले नव्हते. त्यांच्यासोबत 12 आमदारांनीही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भुजबळ यांच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यातूनच भुजबळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे भुजबळ काही दिवस भूमिगत झाले होते.
मुंबईच्या मंडईत भाजी विक्री करणारा तरुण ते पुढे मुंबईचे महापौर, हा छगन भुजबळ यांचा प्रवास बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शक्य झाला होता. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या भुजबळ यांना बाळासाहेबांनी शाखाप्रमुख पदही दिलं होतं.
शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. इतकं सारं मिळूनही भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. त्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला झाला. भुजबळ यांच्यासोबत आमदारांनीही शिवसेना सोडल्यामुळे प्रकरण गंभीर बनलं होतं. भुजबळांची ही कृती बाळासाहेबांच्या जिव्हारी लागणं साहजिक होतं.
शिवसैनिक संधीच्या शोधातच होते आणि 1995 ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. मुंबईतील माझगाव मतदरासंघातून भुजबळ त्यापूर्वी निवडून आले होते. 1995 च्या निवडणुकीतही भुजबळ काँग्रेसच्या उमेदवारीवर माझगाव मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. बाळासाहेबांनी भुजबळांच्या विरोधात बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली.
नांदगावकर तरुण, नवखे होते. शिवसैनिकांच्या बळावर नांदगावकर यांनी भुजबळ यांना पराभवाचा धक्का दिला होता. अशा पद्धतीने शिवसैनिकांनी भुजबळ यांचा वचपा काढला होता. या विजयानंतर 'जायंट किलर' अशी नांदगावकर यांची ओळख झाली होती.
त्यापूर्वी, भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. बाळासाहेबांनीही भुजबळांना धडा शिकवण्याची भाषा केली होती. शिवसैनिकांचा रोष काय असतो, याची भुजबळ यांना कल्पना होती. त्यामुळे ते काही दिवस भूमिगत झाले होते.
या काळात भुजबळ हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते, तत्कालीन मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासोबतच राहिले होते. ते डॉ. पाटील यांच्या निवासस्थानात राहत असत. रात्री झोप लागल्यानंतर भुजबळ हे दचकून उठायचे. डॉ. पाटील त्यांना धीर देत असत, अशी आठवण भुजबळ यांनी नंतर एकदा सांगितली होती.
भुजबळ यांना धडा शिकवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला होता. भुजबळ आणि त्यांच्यासोबत आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता हवी हेती. यासाठी सर्वांना सभागृहात येणं गरजेचं होतं. मात्र शिवसैनिकांचा रोष कायम होता आणि भुजबळ यांच्यावर हल्ल्याचा धोका होता. त्यामुळे त्यांना सभागृहात आणायचं कसं, असा पेच निर्माण झाला होता.
एके दिवशी शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना बोलावून घेतलं. भुजबळ आणि त्यांच्या आमदारांना संरक्षण कोण देणार, असा प्रश्न शरद पवार यांनी आमदारांसमोर उपस्थित केला. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ही जबाबदारी आपल्या अंगावर घेतली होती.
डॉ. पाटील यांनी भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांना आपल्या बंगल्यावर ठेवलं. त्यांना हवे, नको पाहण्यासाठी सर्व सोय केली होती. भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना सभागृहात नेण्याचा दिवस अखेर उजाडला.
डॉ. पाटील हे भुजबळ आणि आमदारांना सोबत घेऊन निघाले. त्याचवेळी मुंबईतील (Mumbai) शिवसेनेच्या एका आमदारानं त्यांना अडवलं आणि पिस्तूल रोखून धरलं. त्यामुळे आमदारांची घाबरगुंडी उडाली होती. डॉ. पाटील यांनी पिस्तूल रोखलेल्या त्या आमदाराला क्षणार्धात ढकलून दिलं आणि भुजबळ, अन्य आमदारांसह थाटात सभागृहात प्रवेश केला.
हे दृश्य पाहून सभागृह अवाक् झालं होतं. त्यानंतर अधिवेशन संपेपर्यंत भुजबळ हे डॉ. पाटील यांच्या बंगल्यावर राहायला होते. झोपेत असताना मी दचकून उठात असे आणि त्यानंतर डॉ. पाटील हे मला त्यांच्या बेडवर झोपवत, अशी आठवण भुजबळ यांनी सांगितली होती. भुजबळ आणि त्यांच्या सोबतच्या भूमिगत आमदारांना आश्रय दिल्यामुळे डॉ. पाटील चर्चेत आले होते.
काही दिवसांनंतर डॉ. पाटील यांना त्रास सुरू झाल्यामुळं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी या रुग्णालयात बाळासाहेब ठाकरे यांचे एक परिचित दाखल झालेले होते. त्यांना पाहण्यासाठी बाळासाहेब ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. डॉ. पाटील हेही तेथे दाखल असल्याची माहिती बाळासाहेबांना मिळाली. त्यामुळे त्यांनी डॉ. पाटील यांची आवर्जून भेट घेतली होती. 'आता तब्येत कशी आहे पैलवान', अशा शब्दांत त्यांनी डॉ. पाटील यांची विचारपूस केली होती.
नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेले भुजबळ यांचं बालपण हलाखीत गेलं होतं. ते नातेवाईकांकडे मुंबईला गेले, पत्राचाळीत वाढले. भायखळा येथील मंडईत त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे शिक्षणही सुरू होते. दहावीनंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. राजकारणाची त्यांना आवड होती. त्यावेळी शिवसेनेची मोठी क्रेझ होती.
भुजबळ यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि अल्पावधीत जम बसवला. केडर बेस पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मुंबईत दरारा होता. अशा काळातच त्यांना शाखाप्रमुखपद मिळालं होतं.
भुजबळ यांनी 1973 मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर पक्षात त्यांचं वजन आणखी वाढीला लागलं. शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला. ओघवती वक्तृत्वशैली भुजबळांसाठी जमेची बाजू ठरली. त्यामुळे ते लोकप्रिय झाले.
महापालिकेत ते विरोधी पक्षनेते बनले आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर 1985 मध्ये त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. माझगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदारही बनले. बाळासाहेबांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्यांमेध्ये त्यांचा समावेश झाला.
भुजबळांची महत्वाकांक्षा वाढत होती. 1990 मध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर त्यांची नजर होती, मात्र त्यांना ते मिळालं नाही. बाळासाहेबांनी हे पद मनोहर जोशी यांना दिलं. त्यामुळं भुजबळ नाराज झाले आणि शिवसेनेचा मंडल आयोगाला विरोध असल्याचं कारण पुढे करत ते बाहेर पडले.
सर्व पदं मिळूनही शिवसेना सोडल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना 1995 च्या निवडणुकीत धडा शिकवला. त्यापूर्वी त्यांच्या भूमिगत होण्याच प्रकरण खूपच गाजलं होतं. त्यानंतर बाळासाहेबांच्या अटकेचे त्यांचे प्रयत्नही खूप गाजले.
2004 मध्ये तेलगी प्रकरणात भुजबळ यांची मोठी बदनामी झाली होती. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. ईडीने त्यांना 14 मार्च 2016 रोजी अटक केली. अनेक महिने ते अटकेत राहिले. भाजपने राजकीय आकसापोटी ईडीची वापर करून भुजबळांना अटक केली, असे आरोप त्यावेळी झाले होते.
आता अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत ते पुन्हा महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आहेत. अशातच आता राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील कथित दाव्यांवरून छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.