

Mumbai News : बारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा सताधारी महायुतीचा प्रयत्न सुरु आहे. शनिवारी सकाळीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा देण्याची मागणी केली.
दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करीन पक्षाची रणनीती ठरवली आहे. काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी केली असली तरी याबाबत महाविकास आघाडीची बैठक होणार असून त्यामध्ये निवडणुक लढविण्याबाबतचा निर्णय होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर आता होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा द्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यामुळे पाठिंबा देण्याबाबत मातोश्रीवरील हालचालींना वेग आला आहे. शनिवारी याबाबत बैठका पार पडल्या. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना पाठींबा देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेसाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार आहेत. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसने (Congress) आपला उमेदवार उभा करण्याचे जाहीर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे याबाबत महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. या एकत्रित बैठकीत बारामती निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी दुपारी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राहुरीमध्ये उमेदवार देण्याबाबत चाचपणी केली जात आहे. याठिकाणी त्यांच्या पक्षाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. मात्र, ही जागा शरद पवार यांच्या पक्षाची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत या दोन्ही विधानसभा निवडणुका लढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याच बैठकीत राहुरी मतदारसंघात कोण लढविणार व उमेदवार कोण असणार? याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.