

Thane Shivsena Political Dispute News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव असलेल्या ठाण्यातील कोपरी परिसरात पक्षांतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महाराष्ट्रभर पक्षविस्तारासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कोपरीतील शिवसेनेच्या संघटनात्मक स्थितीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत.
चेंदणी कोळीवाड्यातील एका कार्यक्रमानिमित्त कोपरीतील शिवसेना शाखेत गेलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना शाखेतील उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र पाहून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रसंगानंतर खासदार नरेश म्हस्के यांनाही या नाराजीचा सामना करावा लागल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चेंदणी कोळीवाड्यात एका क्रीडा कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना आग्रहाने कोपरीतील शिवसेना शाखेत नेले. मात्र, शाखेत प्रवेश केल्यानंतर भिंतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राशेजारी उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हे पाहून श्रीकांत शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांनी शाखेतील पदाधिकारी आणि उपस्थित शिवसैनिकांना जाब विचारल्याचेही सांगितले जाते. या प्रसंगामुळे शाखेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे तेथून बाहेर पडल्याची चर्चा आहे. यावेळी उपस्थित असलेले खासदार नरेश म्हस्के यांनाही या नाराजीचा सामना करावा लागल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात शाखा आणि स्थानिक संघटनांवरील वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाला. ठाण्यातील कोपरीही त्याला अपवाद राहिले नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून या शाखेवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याची पार्श्वभूमी आहे.
मात्र, अपेक्षित राजकीय ताकद उभी करण्यात अडचणी आल्याने शिंदे गटाला या शाखेत उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वासोबतच काम करण्याची तडजोड करावी लागल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एकाच शाखेत दोन्ही गटांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून येत असल्याचे सांगितले जाते.
शाखेच्या भिंतीवर एका बाजूला उद्धव ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असल्याचे चित्र आहे. ही बाब श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची नाराजी उफाळून आल्याची चर्चा आहे. मात्र, हा वाद केवळ एका छायाचित्रापुरता मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून कोपरीत सुरू असलेल्या स्थानिक राजकीय संघर्षाचे ते प्रतीक असल्याचे मानले जात आहे.
या अंतर्गत धुसफुशीमागे केवळ शाखेवरील वर्चस्वाचा प्रश्न नसून कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानाचाही मुद्दा असल्याची चर्चा आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान आणि स्थान मिळत नसल्याची खंत स्थानिक पातळीवर व्यक्त होत असल्याचे समजते. त्यामुळे कोपरीतील शिवसेनेच्या संघटनात्मक परिस्थितीवरून आता पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.