

Chhatrapati Sambhajinagar News : महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. बंडखोरी, नाराजी नाट्य, पक्ष कार्यालयांमध्ये राडे, माघारीसाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर करून झाला. आता लढती स्पष्ट झाल्या आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले आहेत. पक्षांचे जाहीरनामे, आरोप-प्रत्यारोप या सगळ्या धामधुमीत प्रचाराला सुरूवात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना व इतर पक्षाच्या नेत्यांना घराणेशाहीला झुकते माप देत कोणी मुलगा, मुलगी, भाऊ, पीए, जातीचा म्हणून उमेदवारी दिल्याने शहरात मोठी चर्चा होत आहे. भाजप-शिवसेनेच्या मंत्री, खासदार, आमदारांना यावरून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी टारगेट केल्याने मोठा राडा झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे व मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा-मुलगी, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे, अंबादास दानवे यांचे सख्खे भाऊ, मंत्री अतुल सावे यांचे पीए, खासदार भागवत कराड यांचा निकटवर्तीय, भाजपचा निवडणुक प्रमुख अशा लढतीमुळे संभाजीनगर महापालिकेची निवडणूक चर्चेत आली आहे. 29 प्रभागातून 115 नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने सगळेच पक्ष दंड थोटपटून मैदानात उतरले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये भाजपच्या सुवर्णालता साळवे विरुद्ध शिवसेनेच्या पूनम पाटील यांच्यात लढत आहे. सुवर्णालता साळवे या मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नी आहेत. तर त्यांच्या विरोधात सिनेट सदस्य पूनम पाटील मैदानात आहेत. सावे यांच्यावर या उमेदवारीमुळे भाजपच्या निष्ठावंत पदाधिकारी, इच्छूकांनी गंभीर आरोप करत उपोषण, आत्मदहनचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती.
याच प्रभागातील 'क' भाजपचे सागर पाले विरुद्ध शिवसेनेचे किशोर नागरे आणि अपक्ष प्रशांत भदाणे यांच्यात लढत होत आहे. सागर पाले याला उमेदवारी दिल्यानंतर बंडखोर प्रशांत भदाणे यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात जाऊन मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांची गाडी रोखत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. जवळपास तासभर भदाणे त्यांच्या पत्नी आणि कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता तेच अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराच्या विरोधात लढत आहेत.
गुलमंडी प्रभागातून खैरेंचा पुतण्या मैदानात
शहराची मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या गुलमंडी या 15 क्रमांकाच्या 'अ' मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे माजी नगरसेवक सचिन खैरे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या बंटी चावरिया यांच्याशी त्यांची लढत आहे. याच प्रभागातील 'ड' मधून शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव शिवसेनेचे ऋषिकेश जैस्वाल, भाजपचे मिथून व्यास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
हर्षदा शिरसाट यांना भाजपचे आव्हान
प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांची राजकारणात एन्ट्री होत आहे. संजय शिरसाट यांनी त्यांना बिनविरोध आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. आता हर्षदा शिरसाट यांची थेट लढत भाजपच्या मयुरी बरथुने यांच्याशी होत आहे. या लढतीच्या निमित्ताने संजय शिरसाट यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे हर्षदा शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिलेला नाही.
माजी महापौर तुपेंची भाजपशी टक्कर
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी महापालिका निवडणुकीच्या आधीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक 20 ड मधून पुन्हा मैदानात उतरवले आहे. त्यांची फाईट भाजपच्या योगेश वाणी यांच्यासोबत आहे. दुसरी लढत प्रभाग क्रमांक 22 ड मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि भाजपचे लक्ष्मीकांत थेटे यांच्यात रंगणार आहे. राजेंद्र जंजाळ यांनी नाराज होऊन निवडणुकीतून माघारीचा निर्णय जाहीर केला होता. परंतु भाजपसोबतची युती तुटल्यानंतर ते पुन्हा निवडणूक मैदानात उतरले आहेत.
माजी महापौर घोडेलेंची प्रतिष्ठा पणाला..
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेत नऊ माजी महापौरांनी प्रवेश केला आहे. यात नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले या दाम्पत्याचाही समावेश आहे. पक्षाने अनिता घोडेले यांना प्रभाग क्रमांक 29 ब मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोमल तरंगे, भाजपच्या वंदना देवकाते यांच्यासोबत आहे. या निमित्ताने नंदकुमार घोडेले यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिरसाट पुत्र सिद्धांत दुसऱ्यांदा रिंगणात
प्रभाग क्रमांक 29 अ मधून शिवसेनेने पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत यांना दुसऱ्यांदा महापालिकेची उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत भाजपचे भगवान गायकवाड, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे किशोर साबळे, एमआयएमच्या मोनिका मोरे यांच्यासोबत होत आहे. तर प्रभाग क्रमांक 16 ड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत शिंदेसेनेचे मनोज बल्लाळ यांच्याशी आहे.
मामूंची राज्यभर चर्चा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात प्रवेश दिल्यापासून याची राज्यभरात चर्चा होत आहे. त्यांना पक्षाने प्रभाग क्रमांक 4 ब मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची थेट फाईट ही एमआयएमच्या खान अमेर अन्वर यांच्याशी आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मामूंच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. आपण त्यांच्या प्रचाराला जाणार नाही, अशी घोषणा खैरे यांनी केली आहे. दानवे मात्र मामूंच्या प्रचारासाठी फिरत आहेत. आता मामू बाजी मारणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.