Tanaji Sawant News : तानाजी सावंतांची बेताल वक्तव्ये महायुतीला अडचणीत आणणार?

Shivsena Politics : ओम राजेनिंबाळकरांना मीच खासदार केले, अशी फुशारकी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे सतत मारत आहेत. या विधानामागे दडलेला दुसरा अर्थ असा आहे की, 2019 च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी सावंत यांनीच कापली. आतापर्यंत लपून राहिलेली ही गोष्ट आता सावंत हेच जाहीरपणे सांगू लागले आहेत.
Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama

Dharashiv News : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे बेताल वक्तव्ये करण्यासाठी ओळखले जातात. ते काय बोलून जातात, हे त्यांच्यातरी लक्षात येत असेल का, अशी शंका यावी, अशी विधाने ते हल्ली करत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे नाव पुढे आल्यानंतर महायुतीत वाद चिघळेल, अशी वक्तव्ये त्यांच्याकडून केली आहेत. उत्साहाच्या भरात किंवा जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या त्यांच्या या विधानांमागे लपलेला अर्थ कार्यकर्त्यांच्या लक्षात आला, तर महायुतीत गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धाराशिव (Dharashiv) लोकसभा मतदारसंघावर महायुतीतून शिवसेना शिंदे गटानेही दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर आधीपासूनच कामाला लागला आहे. भाजपने शांतपणे तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विविध संभाव्य उमेदवारांसाठी सर्वेक्षणे करण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, डॉ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे इच्छुक आहेत.

भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे इच्छुक आहेत. मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

Tanaji Sawant
Vijay Shivtare : पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक ते कट्टर विरोधक : विजय शिवतारे

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत प्रा. रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. विद्यमान खासदार असतानाही प्रा. गायकवाड यांना शिवसेनेने 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली. प्रा. गायकवाड यांना उमेदवारी नाकारून ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यामुळे आता खरी गंमत सुरू झाली आहे. ओम राजेनिंबाळकर बेरोजगार होते, त्यांना मीच खासदार केले, हे डॉ. सावंत वारंवार सांगत आहेत. पहिल्यांदा ते असे बोलले त्यावेळी लोकांनी ते फारसे मनावर घेतले नाही. मात्र, ते पुन्हा पुन्हा असे बोलू लागल्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्यामागे दडलेला अर्थ लोकांना कळू लागला आहे.

Tanaji Sawant
Loksabha Election 2024 : लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार उभे करणार; सोलापुरात मराठा समाजाचा निर्णय

ओम राजेनिंबाळकर यांना मी खासदार केले, असे ज्यावेळी आरोग्यमंत्री सावंत सांगत असतात त्यावेळी त्यांना असेही सांगायचे असते, की 2019 च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी मीच कापली! उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी डॉ. सावंत यांच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली होती. त्यामुळे डॉ. सावंत हे उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करीत आहेत. त्या नादात ते काय बोलताहेत, हे त्यांना तरी कळत असेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांना उमेदवारी मी मिळवून दिली, यासाठी अमुक रक्कम मी ठाकरे यांना दिली, असे ते सांगत आहेत. म्हणजे प्रा. गायकवाड यांची उमेदवारी कापण्यासाठी मी ठाकरे यांना विशिष्ट रक्कम दिली, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. प्रा. गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत आता हा संदेश गेला आहे. त्यामुळे खासदार राजेनिंबाळकर यांच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.

डॉ. सावंत हे प्रा. गायकवाड यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करत आहेत. नाही म्हटले तरी दोनदा आमदार आणि एकदा खासदार राहिलेल्या नेत्याची ताकद असतेच. प्रा. गायकवाड यांनी 2019 मध्ये उमेदवारी कापल्यानंतरही पक्षविरोधी किंवा नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्ये केली नव्हती. प्रा. गायकवाड हे खासदार असताना सावंत यांची धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री झाली, अर्थात ती उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाली होती. सावंत जिल्ह्यात आल्यामुळे प्रा. गायकवाड यांचे महत्त्व कमी होऊ लागले. त्याची प्रचिती 2019 च्या निवडणुकीत आली. ओम राजेनिंबाळकर यांना पुढे करून गायकवाड यांची उमेदवारी कापण्यात आली.

Tanaji Sawant
Maratha Reservation : सोलापुरात मराठा समाज आक्रमक; भाजप खासदाराचे भाषण बंद पाडले

2019 नंतर सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार पडले. ते पाडण्यात सावंत यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली, कारण त्यांना त्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना तर गमावलेच, मात्र धाराशिवसह लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या, बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके शिलेदार असलेल्या प्रा. गायकवाड यांनाही गमावले. आता सावंत आणि प्रा. गायकवाड हे शिंदे गटात आहेत, ही आणखी मोठी गंमत आहे. राजकारणात अशा गमती जमती सुरू असतात.

डॉ. सावंत यांच्या नादाला लागून ओम राजेनिंबाळकर यांचेही एका अर्थाने नुकसान झाले आहे. राणाजगजितसिंह पाटील हे खासदार झाले तर आपली अडचण होईल, असे समजून राजेनिंबाळकर यांनी प्रा. गायकवाड यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्यासमोर नकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी सावंत यांना मदत केली. राजेनिंबाळकर यांनी लोकसभा लढवली नसती, तर ते धाराशिव विधानसभा मतदारसंघातून लढले असते आणि विजयीही झाले असते. 2019 नंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांची निश्चितपणे वर्णी लागली असती. हा झाला इतिहास.

Tanaji Sawant
Shivtare's Big Announcement : विजय शिवतारेंनी दंड थोपटले; ‘बारामतीतून अपक्ष लोकसभा लढवणार...'

आता सावंत ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत राजेनिंबाळकर यांना होण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत प्रा. गायकवाड यांचे तिकीट सावंत यांनी कापल्याचे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळाली, तर प्रा. गायकवाड त्यांचे काम करतील का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. धाराशिव जिल्ह्यात कागदावर शक्तिशाली वाटत असलेल्या महायुतीत असे अनेक अंतर्विरोध ठासून भरलेले आहेत. ते दूर करण्याऐवजी सावंत यांची वक्तव्ये त्याला खतपाणीच घालत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

R

Tanaji Sawant
Baramati Loksabha Constituency : ‘आता सगळ्यांनी मिळून पवारांना पाडा; होऊद्या एकदा त्यांचा कार्यक्रम’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com