

Solapur, 02 June : काँग्रेस पक्षाला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला असून विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी छाननीत बाद ठरविला आहे. काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही असणारे पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी आपली सही बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे (Congress) आदित्य फत्तेपूरकर यांच्यासह अपक्ष अशोक वाघमोडे या दोघांचे अर्ज बाद झाले आहेत. पाच सूचक व अनुमोदक नसल्याने वाघमोडे यांचा हा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. आता विधान परिषदेच्या रिंगणात भाजपकडून राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वसंतराव देशमुख, तर आमदार दिलीप सोपल समर्थक नागेश अक्कलकोटे, आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय डिकोळे, शिवसेनेचे महेश साठे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे वसंतराव देशमुख असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली होती, पक्षाकडून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांची सूचक म्हणून सही आहे. मात्र, छाननीच्या वेळी भोसले यांनी आक्षेप घेत ती आपली सही नसल्याचे म्हटले आहे.
फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आपण सही केलेली नाही, ती बनावट सही आहे, असे प्रतिज्ञापत्र नगरसेवक नागेश भोसले यांनी दिले आहे. फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेपाची सुनावणी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासमोर झाली. त्यात भोसले यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
चर्चा करून उमेदवार ठरवू : काँग्रेस जिल्हाध्यक्ष
विधान परिषदेची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय डिकोळे यांचा अर्ज आहे. आम्ही चर्चा करून अंतिम उमेदवार जाहीर करू, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी सांगितले.
निवडणूक रद्द करा : प्रणिती शिंदे
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस उमेदवाराचे अनुमोदक नागेश भोसलेंवर दबाव टाकल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
काँग्रेसला सूचकही मिळंना : कल्याणशेट्टी
काँग्रेसला सूचक मिळणंही मुश्किल झालं होतं, त्यातीला एका सूचकाची सही खोटी होती, हे सिद्ध झाले आहे, असे सांगून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यात अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. त्यांना सूचक मिळणंही मुश्किल झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.