
Kolahapur News : राज्यभरात 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट घेऊन भाजपकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. सर्वच स्तरातून आणि वर्गातून भाजप सदस्य नोंदणीसाठी आमदार खासदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांची प्रयत्नांची परकाष्टा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील भाजप पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसह महायुतीला यश मिळाल्यानंतर भाजप सदस्य नोंदणीला गती आली आहे. जिल्ह्यात सात लाख सदस्यांचे उद्दिष्ट ठेवून उतरलेल्या भाजपने आतापर्यंतच्या सदस्य नोंदणी नुसार जवळपास दोन लाख 65 हजार इतक्या सदस्य नोंदणीपर्यंत मजल मारली आहे.
भाजप (Bjp) सदस्य नोंदणीला 1 जानेवारीपासून सुरुवात झाली. जानेवारीपर्यंत ही सदस्य नोंदणी केली जाणार होती. मात्र, भाजपला वाढता प्रतिसाद पाहता भाजप नोंदणीची तारीख ही 19 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. भाजपच्या राजकीय बेरजेनुसार प्रत्येक बूथवर किमान 200 भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार आज पर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने आत्तापर्यंत जिल्ह्यात जवळपास दोन लाख 65 हजार सदस्यांची नोंदणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप सदस्यांची नोंदणी पाहता कोल्हापूर शहराला 1 लाख 33 हजार 800, कोल्हापूर (पूर्व) भागाला 2 लाख 50 हजार, तर कोल्हापूर (पश्चिम) 3 लाख 6 हजार 200 सदस्य नोंदणीचे लक्ष होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील आढावा घेतला तर बूथनुसार दिलेल्या लक्ष्यानुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात अव्वलस्थानावर आहे. या मतदारसंघाला 53 हजार 200 भाजप सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले होते. पण हे उद्दिष्ट पूर्ण करत त्यापुढेही इचलकरंजीत जवळपास 60 हजारांची भाजप सदस्य नोंदणी झाली आहे. यापूर्वी भाजपकडून माजी आमदार सुरेश हळवणकर पक्षस्तरावर काम करताना दिसत होते. त्याला माजी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade), आणि आमदार राहुल आवाडे यांची साथ मिळाल्याने भाजप सदस्य नोंदणीत जिल्ह्यात इचलकरंजी आघाडीवर राहिली आहे.
दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातून 70 हजार 800 भाजप सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले होते. आतापर्यंत जवळपास 63 हजार भाजप सदस्य नोंदणी केली आहे. कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजप साठी हे चांगले दिवस म्हणावे लागतील. महाडिक आणि पाटील गटात विभागलेल्या या मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी तितकीच लक्षणीय समजली जाते. तर कोल्हापूर उत्तर तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत शहरात जवळपास 22 हजारपर्यंत भाजप सदस्य नोंदणी झाली आहे.
विशेष म्हणजे शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे प्राबल्य असताना पक्ष वाढीला मर्यादा आल्या होत्या. या मतदारसंघात काही अंशी सदस्य नोंदणीला ब्रेक मिळाला असला तरी सदस्य नोंदणीची संख्या पाहता या मतदारसंघात सदस्य नोंदणीची संख्या पक्ष वाढीसाठी महत्त्वाची आहे. त्या पाठोपाठ कागल विधानसभा मतदारसंघात ही भाजपला नेतृत्व नसले तरी आतापर्यंत जवळपास दहा हजार सदस्य नोंदणी झाली आहे. तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने भाजप सदस्य नोंदणीला या विधानसभा मतदारसंघात ब्रेक मिळाला आहे.
ज्या मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्या मतदारसंघात देखील भाजप सदस्य नोंदणी अल्प प्रमाणात झाली आहे. करवीर, राधानगरी, शिरोळ सदस्य नोंदणी जवळपास 21 हजारांच्या जवळपास आहे. मात्र, भाजप पक्ष वाढीसाठी ही सदस्य नोंदणी अत्यंत आनंदाची आहे.
दोन बुथवर 200 नोंदणी करण्याची तांत्रिक अडचण
भाजपच्या धोरणानुसार एक बूथवर किमान 200 सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, शाहुवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, गगनबावडा, सह अनेक तालुक्या दुर्गम भागातील बूथवर 500 पेक्षा कमी मतदार संख्या असल्याने या केंद्रावर 200 सदस्य नोंदणी करण्याची अडचण भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुढे आहे. अशा परिस्थितीत ही अशा वाड्यान वस्त्यांवर जाऊन भाजप सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांचा सुरू आहे.
भाजप नोंदणीसाठी लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते देखील तितकेच उत्साही आहेत. या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून शासकीय योजनेची माहिती त्या सदस्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. केवळ निवडणूक म्हणून नव्हे तर इतर वेळी देखील 24 तास नागरिकांची सेवा होणे या उद्दिष्टाने भाजपचे काम सुरू असल्याचे कोल्हापूर शहर भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.
लोकांचा उत्साह पाहता भाजप सदस्य नोंदणीला 19 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील भाजप सदस्य नोंदणीची संख्या ही 5 लाखपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट 19 फेब्रुवारीपर्यंत आहे. उद्दिष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्या मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी हेच भाजपचे यश असणार असल्याचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितले.
30 जानेवारीच्या आकडेवारीनुसार
विधानसभा मतदारसंघ | लक्ष्य | आतापर्यंतची सदस्य नोंदणी
चंदगड 78,000 16,644
राधानगरी 85,000 21,775
कागल 71,600 9,573
कोल्हापूर दक्षिण 70,800 62,327
कोल्हापूर उत्तर 63,000 22,064
शाहुवाडी 68,000 17,222
करवीर 71,600 20,385
इचलकरंजी 53,200 59,389
शिरोळ 61,400 21,543
हातकणंगले 66,800 15,690
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.