

Sangli, 26 May : राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी यांना पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी त्यांची सूचना घेऊन मिरजे आले होते. मात्र, नायकवडी यांनी त्या गोष्टींचा इन्कार केला आहे. मला राजीनामा देण्यास सांगितलेले नाही, ह्या सर्व अफवा आहोत, असे म्हटले होते. मात्र, इद्रिस नायकवडी यांनी यापूर्वी 2011–2013 मध्ये सांगली-मिरज-कुपवाडचे महापौर असतानाही राजीनामा देण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला नडलेले इद्रिस नायकवडी हे आणखी चार वर्षांची आमदारकी सहजासहजी सोडतील, असे वाटत नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अल्पसंख्याक समाजाला संधी द्यायची; म्हणून इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर पाठवले होते. नायकवडी यांनीही विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी कष्ट घेतले होते. मुस्लिमबहुल भागात त्यांच्या सभेला झालेल्या गर्दीवरून ते यशस्वी झाल्याचे दिसून येते. त्याचीच बक्षीसी म्हणून अजितदादांनी नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिली होती.
नायकवडी कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार कुटुंबीयांशी जोडले गेलेले आहे. इद्रिस नायकवडी (idris naikwadi) यांचे वडिल इलियास हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. पवारांनीही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख केले होते. इद्रिस हेसद्धा राष्ट्रवादीत काम करत होते. मात्र जयंत पाटील आणि त्यांच्यात तेवढे सख्य नव्हते, त्यामुळे जयंत पाटलांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणूनच राष्ट्रवादीत त्यांच्याकडे पाहिले जायचे. सध्या त्यांचे चिरंजीवही सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत.
सांगलीच्या महापौरपदाच्या राजीनाम्याबाबत इद्रिस नायकवडी म्हणाले, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचा महापौर असताना मला राजीनामा मागण्यात आला होता. माझी कामाची पद्धत (स्वतंत्रपणे काम करण्याची हातोटी) काहींना आवडली नसावी; त्यामुळेच बहुधा माझा राजीनामा काहींनी मागितला असावा. महापालिकेत सत्तेजवळ पोचण्यासाठी सर्व संख्याबळ मी तयार केले होते. स्थानिक आघाडी स्थापन करून ती सत्तेवर आणली होती. त्यासाठी सर्वाधिक प्रयत्न मी केले होते. पण, माझी कामाची पद्धत काहींना अडचणीची वाटली असवी, त्यातून काहींनी तो प्रयत्न केला होता. मात्र, मी राजीनामा दिला नव्हता.
अजितदादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी अवघ्या पाच मिनिटांत मीही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. दादांना माझ्या कामाची पद्धत माहिती होती. महापौरपदाचा राजीनाम्याच्या वेळी अजितदादांना मध्ये घालण्याचा प्रयत्न झाला होता. पण, मी काम करणारा माणूस आहे, हे ओळखून ते स्पष्टपणे सांगून बाजूला झाले होते. त्या वेळीची परिस्थिती त्यांना माहिती होती. त्या वेळी माझ्या कामाची पद्धत त्यांनी हेरली होती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिली होती, असेही इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले.
नायकवडी म्हणाले, भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अल्पसंख्याक समाजात अंतर पडलं होतं. मात्र, विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून अल्पसंख्याक समाजाला पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विधानसभेला मिळालेल्या यशात माझाही खारीचा वाटा होता, हे अजितदादांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी चांगलं काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला १६ ऑक्टोबर २०२४ रोजी विधान परिषदेची संधी देण्याचा निर्णय घेतला होता.
आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी काय सांगितलं होतं?
विधान परिषदेची संधी देताना अजितदादांनी ‘ती एवढी वर्षे असणार,’ असं काही सांगितलं नव्हतं. न मागता त्यांनी मला संधी दिली होती. पण आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी सांगितलं होतं की, विधान परिषदेची संधी एकवेळ असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विधान परिषद सदस्याने विधानसभेचा एक मतदारसंघ तयार करावा, त्या दृष्टीने मी कामाला लागलो आहे, असेही इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांतदादांशी जुळले सूर
दरम्यान, इद्रिस नायकवडी यांना अजितदादांनी अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधीत्व म्हणून संधी दिली होती. मात्र अलिकडच्या काळात त्यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चांगलेच सख्य जुळल्याची चर्चा सांगलीच्या राजकीय वर्तुळात आहे. पाटील यांच्यासोबत ते अनेक कार्यक्रमांत दिसून येत होते. त्यामुळे या घडामोडी अशाच सुरू राहिल्या तर सांगलीत राष्ट्रवादीला आणखी एक नेता गमावण्याची वेळ नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.