Mangalvedha News : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्याच्या मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. 14 मार्च) मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवेढ्यात आलेल्या आमदार समाधान आवताडे यांचा 24 गावांतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना आवताडे यांनी या योजनेला मंजुरी मिळविताना आलेली एक आठवण सांगितली. माझ्याकडे येणारे आमदार हे कामाचा ठेका किंवा नोकरी, बदलीसाठी येतात. तुम्ही एकमेव आमदार आहात की पाण्यासाठी आलात, असे जलसंपदा सचिवांनी सांगताच माझे डोळे पाणावले, असे आवताडे यांनी नमूद केले.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळविल्यानंतर आमदार समाधान आवताडे हे आज मतदारसंघात दाखल झाले. त्यांचा सत्कार 24 गावांतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. आमदार आवताडे म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांतील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मी आमदार झाल्यापासून हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही घेतल्यानंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या विभागात सहीसाठी गेलाे. त्या विभागाचा अधिकारी हा सेवानिवृत्त झाल्यामुळे सहीसाठी विलंब होत होता. मात्र, राज्यपालांच्या आदेशाने त्या विभागाला अधिकारी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मी सही घेऊन तो प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मध्यरात्री 12.50 मिनिटांनी कॅबिनेट मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठीच्या टिपणीसाठी प्रयत्न करून रात्री एकनंतर टिपणी तयार करून कॅबिनेट समोर ठेवली आणि दुपारी 1 वाजून 41 मिनिटांनी माझ्या मोबाईलवर मंगळवेढा उपसा सिंचन योजना (Mangalvedha Upsa Irrigation Scheme) मंजूर झाल्याचा मेसेज आला, असे समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी स्पष्ट केले.
समाधान आवताडे म्हणाले, मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाल्याचा मेसेज आल्यानंतर मी लगेच जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले. पण, आज माझ्या मुलानेही ‘तुम्ही मंजुरीचा कागद आणला. पण, या भागात पाणी कधी आणणार, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, हाही प्रश्न मी येत्या काही दिवसांत जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे. त्यामुळे दुष्काळी जनतेला कागद न दाखवता पाणी दाखवणार आहे.
गेली तीन वर्षे करत असलेल्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार्य केल्याचे सांगत या पुढील काळात रस्ते योजनांची कामे व मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न असलेल्या ‘एमआयडीसी’चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे, असेही आवताडे यांनी स्पष्ट केले.
या वेळी विष्णुपंत आवताडे, सोमनाथ आवताडे, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, सरोज काझी, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, आंबादास कुलकर्णी आदींसह 24 गावांतील नागरिक उपस्थित होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.