

Satara ZP issue sparks political debate: सातारा झेडपीच्या अध्यक्षपदावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असून हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला मंत्री आणि आमदारांनी हजेरी लावली आहे. या बैठकीनंतर या वादावर तोडगा निघणार की काही महत्वाचा राजकीय निर्णय होणार याकडं आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
मंत्री शंभुराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम हे या बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. तसंच अर्जुन खोतकर, संतोष बांगर आणि मनिषा कायंदे, सुहास कांदे, अशोक पाटील तसंच मुरजी पटेल आणि सुहास बाबर या आमदारांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार असल्याचं सुत्रांकडून कळते आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचा ताजा वाद हा मुख्यतः २० मार्च २०२६ रोजी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीभोवतीचा आहे. ही निवडणूक खूपच नाट्यमय आणि वादग्रस्त ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे २७ जागा होत्या, तर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्या मिळून ३५ + जागा होत्या.
तरीही भाजपने प्रिया शिंदे (महेश शिंदे यांच्या पत्नी) यांना अध्यक्ष आणि राजू भोसले यांना उपाध्यक्षपदी निवडून आणले. विजय अवघ्या एक किंवा तीन मतांच्या फरकाने झाला. यासाठी आमदारांची फोडाफोडी, सदस्यांना दडपशाही आणि यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य (अनिल देसाई आणि संदीप मांडवे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले किंवा अडवले, ज्यामुळे ते मतदानापासून दूर राहिले. त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) जखमी झाले. त्यांच्यावर धक्काबुक्कीचा आरोप आहे, तर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. विरोधकांनी (शिवसेना-NCP) जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि एसपी तुषार दोशी यांच्यावर राजकीय गुलामगिरी आणि भाजपला मदत करण्याचा आरोप केला आहे. यामुळं लोकशाहीचा खून झाल्याचे वर्णन केले जात आहे.
शिवसेनेने भाजपवर लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करत भविष्यातील निवडणुकांमध्ये परिणाम होईल, अशी चेतावणी दिली आहे. काही ठिकाणी अपात्रतेची कारवाई करण्याची धमकीही आहे.
महायुतीतीलच मंत्र्यांमध्ये अर्थात शिवसेनेचे शंभूराज देसाई, मकरंद पाटील विरुद्ध भाजपचे जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये वाक् युद्ध आणि विवाद सुरू आहे.
हा मुद्दा आता विधानपरिषदेतही मांडण्यात आला आहे. दरम्यान, विधानपरिषदेत सभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी कडक पाऊल उचलत तातडीनं सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.