

Satara, 06 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम लढत आहेत. मात्र, जगताप यांनी पहिलाच घाव भाजपवर घालत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चुचकारले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना भाजपबाबत फार प्रेम असेल असं मला वाटत नाही. या दोन्ही पक्षांवर महायुतीत अन्यायच झाला असून ते स्वाभिमानाची लढाई लढतील, अशा शब्दांत झेडपीतील वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.
अभयसिंह जगताप (Abhay Jagtap) म्हणाले, सांगली-सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हल्ली पडझड झाली असली तरी हा जिल्हा क्रांतिकारी विचारांचा आहे. महाविकास आघाडीसोबत या भागातील लोकप्रतिनिधी उभे राहतील, त्यामुळे आम्ही ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत.
महायुतीमधील सर्वांत मोठा असलेल्या भाजपने (BJP) इतर दोन पक्षांवर साताऱ्यात अन्यायच केला आहे. पालकमंत्री किंवा राष्ट्रवादीचे मंत्री यांच्यावर जर अन्याय होत असेल तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची अवस्था काय असेल, असा सवाल अभयसिंह जगताप यांनी केला.
ते म्हणाले, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना निधी दिला जात नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष महायुतीत असले तरी त्यांच्याबाबत दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात हे सर्व तिघे एकत्र असले तरी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य दररोज नव्या अडचणींचा सामना करतात. त्यांना भाजपबाबत फार प्रेम असेल असं मला वाटत नाही. ते खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वाभिमानाची लढाई लढतील, असा मला विश्वास आहे.
मी महाविकास आघाडीचा उमेदवार असून आमच्या पॅनेलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीन पक्षाचे चिन्ह असेल. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून अनेक लोक, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहतील, असा दावाही जगताप यांनी केला.
ते म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे संपूर्ण सहकार्य मला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवत असून मित्रपक्षांचे मतदार कोणीही इकडे तिकडे जाणार नाही, याची मला खात्री आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी सर्वांची भेट घेणार आहे. त्यांचा निर्णय त्यांच्या जवळच असणार आहे. पण मी उमेदवार म्हणून सर्वांची भेट घेणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या सर्वांना मी साताऱ्यात येण्याची विनंती करणार आहे. जिल्ह्यातही अनेक ज्येष्ठ नेते आहेत. पण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादाशिवाय ही निवडणूक मला शक्य नाही, त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे, असे जगताप यांनी नमूद केले.
मी सुरुवातीला निवडणूक लढविण्यास तयार नव्हतो...
माझ्या हाताचं ऑपरेशन झाल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी मी सुरुवातीला तयार नव्हतो. पण, शरद पवार आणि ज्येष्ठांनी माझ्यावर विश्वास टाकल्याने मी त्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यास तयार झालो. सध्या हाताला सर्जरी झालेली असली तरी मी मोठ्या ताकदीने फिरत आहे, असेही अभय जगताप यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.