

Kolhapur, 08 May : सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच तालुके कार्यक्षेत्र असलेल्या रेठेरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक पुढ ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी केलेल्या सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांच्या उत्साहावर काही महिन्यांसाठी विरजण पडण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची (Krishana Sugar Factory) निवडणूक पावसाळ्यानंतर होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कारखाना म्हणून ओळखला जातो. कराड, वाळवा, कडेगाव, पलूस, खानापूर या पाच तालुक्यांमध्ये या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. सुमारे पन्नास हजार सभासद असलेल्या या कारखान्यावर सध्या भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांचे वर्चस्व आहे. आमदार भोसले यांच्या गटाचे सुरेश भोसले सध्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा होईल, असं एकंदरीत चित्र होतं, त्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रियाही सुरू झाली होती. सत्ताधारी आमदार डॉ. अतुल भोसले आणि सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचे अविनाश मोहिते यांच्या पॅनेलनी निवडणुकीसाठी तयारी केली आहे. मात्र, अविनाश मोहिते यांनी पत्नी अर्चना मोहिते यांच्या हाती निवडणुकीची सर्व सूत्रे सोपवली आहेत. गावोगावी बैठकांचे सत्रही सुरू आहे.
दरम्यान, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या गटाची भूमिका कारखाना निवडणुकीसंदर्भात अजूनही निश्चित झाली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इंद्रजीत मोहिते यांच्या गटाने निवडणुकीसाठी तलवार म्यान केली की काय, अशी चर्चा रंगली आहे.
कारखान्याची निवडणूक मतपत्रिकेवर होत असल्याने हजारो कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेसाठी लागतात. सध्या प्रशासनात जनगणनेची लगबग सुरू आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा पडू शकतो. त्यामुळेही निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.