Vaishali Rupali Restaurant : एफसी रोडवरील वैशाली, रूपाली हॉटेलांना टाळे? स्वच्छतागृहाशेजारी डोसा-उत्तप्पा ! एफडीएची कठोर कारवाई

FDA Suspends Licences : एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत वैशाली हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.
FDA Suspends Licences Vaishali Rupali Restaurant
FDA Suspends Licences Vaishali Rupali Restaurant sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुण्यातील खवय्यांच्या पसंतीचे आणि एफसी रोडवरील प्रसिद्ध वैशाली व रूपाली हॉटेलला अन्न व औषध प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर दोन्ही रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, अन्नपदार्थांची असुरक्षित साठवणूक अशा गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांच्या आवडत्या खाद्यठिकाणांवरच एफडीएने कारवाईचा बडगा उगारल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत वैशाली हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. ९८ पैकी अवघे ५८ गुण मिळाल्याने या हॉटेलची नोंद नियमांचे पालन न करणारे आस्थापन म्हणून करण्यात आली. विशेष म्हणजे, जून २०२६ मध्येही तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनाने थेट परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.

वैशालीच्या स्वयंपाकघरातील परिस्थिती अधिक धक्कादायक असल्याचे तपासणीत समोर आले. जागेची कमतरता असल्याने कच्चा माल ठेवण्यासाठीचा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या लगत ठेवण्यात आला होता. डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाशेजारी होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आली होती.

उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य तयार खाद्यपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले जात होते. त्यातच कच्च्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवल्याने अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता.

दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटमध्येही स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे आढळले. स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याने धूळ, घाण तसेच कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचणे, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि अपुरी स्वच्छता अशा त्रुटी आढळल्या. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार खाद्यपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवले जात नव्हते. त्यावर लेबल आणि वापरण्याची अंतिम तारीखही नमूद करण्यात आली नव्हती.

FDA Suspends Licences Vaishali Rupali Restaurant
Nashik FDA Action : तुकाराम मुंढेंच्या FDA'चा नाशिक विभागात कारवाईचा धडाका सुरुच, 22 दिवसांत 120 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित..

दोन्ही हॉटेलमध्ये अन्नपदार्थांच्या तापमानाच्या नोंदी, पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आराखडा, प्रमाणित कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या नोंदींचाही अभाव आढळला. कीटकप्रतिबंधक व्यवस्था आणि प्रशिक्षित पर्यवेक्षकाबाबतही त्रुटी निदर्शनास आल्या.

सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सुनावणीनंतर १३ नोव्हेंबर रोजी परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

...तो पर्यंत खाद्यपदार्थांची विक्री नाही

परवाने निलंबित झाल्याने वैशाली आणि रूपाली या दोन्ही रेस्टॉरंटना खाद्यपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी करता येणार नाही. तपासणीत आढळलेल्या सर्व त्रुटी दूर केल्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी केली जाईल. अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत असल्याची खात्री झाल्यानंतर आणि प्रशासनाची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच या दोन्ही हॉटेलना व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या आवडत्या खाद्यठिकाणांचे दरवाजे पुन्हा कधी उघडणार, याकडे खवय्यांचे लक्ष लागले आहे.

FDA Suspends Licences Vaishali Rupali Restaurant
FDA : पुण्यात एफडीएचा मिठाई-फराळ विक्रेत्यांवर छापा; २० परवाने निलंबित! तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.