
Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारही आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला व खातेवाटपही झाले. मात्र, दुसरीकडे अद्याप महामंडळावरील नियुक्त्या झालेल्या नाहीत. या महामंडळावरील नियुक्तीसाठी तीन पक्षातील अनेक नेतेमंडळी इच्छूक आहेत. त्यातच आता मंत्रिपदाचा लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारने झटका दिला.
मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. तर दुसरीकडे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनाही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून मुक्त केले जाणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सिडकोच्या अध्यक्ष पदासाठी आतापासूनच आमदारांकडून लॉबिंग केले जात आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही काही दिवसापासून सिडकोच्या अध्यक्षपदावर कायम होते. मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. शिरसाट हे यापूर्वी शिंदे गटाची हिरारीने बाजू मांडत होते. ते शिंदे गटाचे प्रवक्तेदेखील आहेत. महायुती सरकार असताना गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नव्हती. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात त्यांना सिडको अध्यक्षपद देण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात मंत्रीपदाची निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मंत्रिमंडळात वर्णी लागून महिना उलटून गेला तरी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना या पदावरून मुक्त करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते.
संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर नियमानुसार गुरूवारी शासन निर्णयानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आला असल्याची माहिती देण्यात आली. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील 202 कलमान्वये प्रदान अधिकाराआधारे शिरसाट यांची मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने त्यांना पदमुक्त करत असल्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. शिरसाट यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यानंतर या पदासाठी आमदारांमध्ये जोरदार लॉबिंग सुरु असून या पदासाठी महायुतीमधील तीन पक्षांत इच्छुक आमदारांची संख्या मोठी आहे.
फडणवीस सरकारमध्ये रोहयो मंत्रीपदी भरतशेठ गोगावले (Bharat Gogavale) यांची वर्णी लागली आहे. त्यानुसार येत्या काळात लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून गोगावले यांना ही मुक्त केले जाणार असल्याचे समोर येत आहे. इतर ही महामंडळाच्या अध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
दरम्यान, लवकरच आता नवीन सिडको अध्यक्षाची निवड केली जाईल. सिडकोचे अध्यक्षपदासाठीही आता मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले आहे. नवी मुंबईतील आमदार आणि इतरांनी या पदासाठी फिल्डिंग लावल्याचे समजते. आता सिडकोचे अध्यक्ष पद कुणाला मिळते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.