

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर मतभेद असल्याचे समोर आले होते. निवडणूक आयोगात दोन वेगवेगळी पत्रे दिल्याने सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या पत्रात नसल्याने त्यांना राष्ट्रवादीतून साईडलाईन केल्याच्या चर्चा प्रसार माध्यमात सुरु होत्या. मात्र, गेल्या आठ दिवसातील घडामोडी पाहिल्यातर तटकरे-पटेल जोडीने 'मास्टरस्ट्रोक' मारला आहे.
गेल्या सोमवारी रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी विधानपरिषद मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना मिळालेली उमेदवारी व त्यानंतर झालेली बिनविरोध निवड तर रविवारी राज्यसभेच्या रिक्त जागेवर मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी प्रफुल पटेल यांनी त्यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून दिली. यानिमित्ताने तटकरे-पटेल जोडगोळीने पक्षातील वरचष्मा सिद्ध केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नसल्याने एकच गहजब झाला होता. तटकरे-पटेलांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त तेव्हा पसरले होते. यानंतर काही दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साईडलाईन करण्यात आल्याचेही सांगितले जात होते.
दुसरीकडे पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्या प्रचंड अंतर्गत धुसफूस असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) तटकरे आणि पटेलांचे स्थान डळमळीत झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्याच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अवघ्या महिनाभरातच अनुक्रमे अनिकेत तटकरे आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही आपला वरचष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. त्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 18 जूनला पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
गेल्या दोन दिवसापासून कोअर कमिटीच्या बैठकांचे सत्र सुरूच होते. शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव फायनल मानले जात होते. मात्र, रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अनपेक्षितपणे राजेंद्र जैन यांचे नाव समोर आले. प्रफुल पटेल यांच्या निकटवर्तीय जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.
एकीकडे मंत्री भुजबळ यांनी पुतणे समीर भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी अट ठेवली होती. हीच अट छगन भुजबळ यांच्या दिल्लीत राज्यसभेवर जाण्याच्या मार्गात मोठा अडथळा ठरली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे बैठकीत शेवटच्या क्षणी भुजबळ ऐवजी इच्छुक असलेल्या राजेंद्र जैन, अमरसिंह पंडित यांना बैठकीत बोलविण्यात आले होते. त्यामुळे या दोन नावावर देखील बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.
राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत रायगडमध्ये भाजप आणि शिंदे गटात प्रचंड रस्सीखेच असतानाही सुनील तटकरे यांनी आपले सर्वपक्षीय संबंध आणि राजकीय अनुभव वापरुन त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली.
एवढेच नव्हे तर अनिकेत तटकरे यांची रायगड विधानपरिषदेतून बिनविरोध निवडही झाली. हे अर्थातच सुनील तटकरे यांचे यश मानले जात आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यासारखा मंत्री असलेला नेता रिंगणात असताना अनपेक्षितपणे शेवटच्या क्षणी प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली. यानिमित्ताने राजकीय वर्तुळात तटकरे-पटेल यांच्या या यशाची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.