Dada Bhuse News: मालेगावच्या राजकारणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना मोठा दणका दिला आहे. राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अपूर्व हिरे यांच्या संस्थेच्या शाळांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. व्यक्तिगत राजकारणातून शैक्षणिक संस्थेवर झालेली कारवाई चर्चेचा विषय आहे.
शिक्षण मंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यातील राजकीय वैर टोकाला पोहोचले आहे. विधानसभा निवडणुकीत या दोघांनीही एकमेकांविरोधात निवडणुका लढवल्या होत्या. त्या निवडणुकीआधी हिरे यांच्यावर विविध फौजदारी कारवाईचा ससेमीरा लागला होता.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते दादा भुसे आणि हिरे कुटुंबीय यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अद्वय हिरे यांनी उमेदवारी केली होती. त्यात भुसे यांनी हिरे यांचा पराभव केला.
गेली तीन वर्ष भुसे आणि हिरे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू आहे. मंत्री भुसे यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप हिरे यांनी यापूर्वी केला आहे. या दोन्ही नेत्यांतील संघर्ष कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
या वादाने आता अतिशय वेगळे स्वरूप धारण केले आहे. शिक्षण संचालकांनी हिरे यांच्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या २८ शाळांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या शाळांमध्ये पटसंख्या आणि नियुक्त्या यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
गतवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षण संचालक व विभागाने या शाळांचे ऑडिट केले होते. त्यामध्ये उपस्थित विद्यार्थी आणि पटावरील विद्यार्थी यामध्ये तफावत आढळली. अनेक शिक्षकांच्या नियुक्ती आणि प्रत्यक्ष काम यात तफावत आढळली.
पटसंख्या फुगवून दाखवून पदनियुक्त्या करण्यात आल्या होत्या, शिक्षण विभागाने असा ठपका ठेवला. शासकीय निधीचा गैरव्यवहार या माध्यमातून झाला. शैक्षणिक कामकाजाकडेही संस्थेने उदासीनता दाखवली.
वरील कारणांच्या आधारे आता शिक्षण संचालकांनी या 28 शाळांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. तीन वर्षांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची संस्था असलेल्या हिरे यांना मोठा दणका बसला आहे.
शिक्षण मंत्री भुसे आणि हिरे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वय हिरे यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. मात्र सत्ताधारी पक्षात प्रवेश करू नये भाजपकडे घेतलेला राजाश्रय हिरे यांना कामी आला नाही.
शिक्षण विभागाच्या या कारवाईला राजकीय व्देषातून केलेली कारवाई असल्याची टीका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हिरे यांनी मात्र यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे, निकटवर्तीयानी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.