

Ashok Kharat : आपल्याकडील कथित शक्तींचा आव आणून निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरातविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तब्बल 3,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले असून भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आला आहे.
खरातने त्याच्याकडे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या भक्तांची वेगवेगळे फंडे वापरुन फसवणूक करून तब्बल 42 कोटी रुपयांची माया जमवल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. त्याचे पुरावेही देण्यात आले आहेत. खरातने बनावट पद्धतीने 142 बँक खाती उघडली असा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे खरात याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आरोपपत्रातील माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचा दावा करत असे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन तो भक्तांवर स्वतःचा प्रभाव निर्माण करायचा. रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप तसेच वाघाच्या कातड्याचा वापर करून आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे तो भासवत असे. इतकेच नव्हे तर, महिला भक्तांना गुंगीचे औषध दिल्याचा व लैगिंक शोषण केल्याचा उल्लेख आहे.
भोंदू खरातने भक्कांची आर्थिक लूट केली. बाजारात कवडीमोल भावाने मिळणारे साधे चिंचोके त्याने पॉलिश करुन प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकले. तसेच खडे आणि मधाच्या बाटल्यांना प्रत्येकी 9 लाख रुपयांना विकून त्याने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.खरातचे श्रीमंत व्यावसायिकांना टार्गेट करत असे. दैवी प्रकोप तसेच कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, तुमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार आहे, अशी भीती तो श्रीमंतांच्या मनात घालायचा. या भितीपोटी घाबरलेले व्यावसायिक त्याच्या जाळ्यात ओढले जायचे आणि त्यानंतर हा भोंदू बाबा 'अवतार पूजा' आणि मोठ्या देणग्यांच्या नावाखाली त्याने कोट्यावधी रुपये उकळले.
काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने तब्बल 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले. हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. 3,000 पानांच्या आरोपपत्रातून ईडीने भोंदू अशोक खरातच्या साम्राज्याचा काळा चेहरा उघड केला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 19.20 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे. तर 17.70 कोटींची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने आणि अलिशान मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे. खरात यांचे सहकारी अरविंद बावाके यांनी 18 ते 20 कोटींच्या रोख व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारे यांनी 34 बेनामी खाती उघडण्यास मदत करून व्यवहार लपवल्याचे तपासात समोर आलं आहे.
दरम्यान खरातची फरार पत्नी कल्पना खरात हिच्यावरही कथित बेकायदेशीर निधीतून खरेदी केलेल्या मालमत्ता स्वतःच्या नावावर नोंदवून मनी लॉन्डरिंगला मदत केल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.