Dr. Shobha Bachhav News : धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. शोभा बच्छाव काँग्रेसच्या उमेदवार आहेत. येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आज एक धक्कादायक अनुभव आला. श्रीमती प्रियंका गांधी नंदुरबारच्या प्रचार सभेसाठी विशेष विमानाने धुळे येथे येणार होत्या. त्यांच्या स्वागतासाठी मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, या गर्दीत विशेष अपेक्षित असलेल्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव कुठेही दिसल्या नाहीत.
सामान्यता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मतदारसंघात आल्यास पक्षाच्या उमेदवाराने त्यांच्या स्वागताला जाणे हा प्रोटोकॉल असतो. या प्रोटोकॉलचे उल्लंघन धुळ्याच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी केल्याने कार्यकर्ते संतप्त होते. प्रचारात व्यस्त असलेले पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी देखील प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी आले होते.
आमदार कुणाल पाटील यांचा याच दरम्यान आदिवासी मेळावा देखील होता. त्यासाठी चार हजार आदिवासी धुळे येथे एकत्र आले होते. मात्र अन्य नेत्यांना तेथे पाठवून आमदार पाटील व वरिष्ठ पदाधिकारी प्रियंका गांधी यांच्या स्वागताला उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांची प्रियंका गांधी यांनी आवर्जून चौकशी देखील केली. मतदार संघाची माहिती घेतली प्रचार कसा सुरू आहे. याबाबत चर्चाही झाली. मात्र यावेळी उमेदवार अनुपस्थित असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
नंदुरबार येथील सभेच्या निमित्ताने श्रीमती गांधी विशेष विमानाने धुळे येथे आल्या होत्या. तेथे डॉक्टर बच्छाव यांच्या कन्या आल्या होत्या. त्यांनी प्रियंका गांधी यांनी उमेदवार डॉक्टर बच्छाव यांना मतदान करावे, असे आवाहन करणारा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. यावेळी आमदार पाटील यांनी मध्यस्थी करून हा व्हिडिओ तयार केला.
धुळे मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. त्याचा अनुभव आज खुद्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि अन्य पदाधिकाऱ्यांना आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार येथे श्री. पटोले यांची भेट घेतली. धुळे मतदारसंघातील विस्कळीत प्रचार यंत्रणेबाबत लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
दरम्यान, याबाबत डॉ. बच्छाव यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, मी मालेगाव येथे प्रचारात होते. प्रियंका गांधी एका मोठ्या सभेसाठी आल्या होत्या. त्याचा खर्चही मोठा होता. आम्ही तिथे गेलो असतो तर, त्या खर्चाचा काही भार आमच्यावर पडला असता. त्यामुळे आम्ही तेथे जाणे टाळले असे सांगितले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.