Nashik Political : नाशिकला एक - दोन मोठे उद्योग आल्यास विकासाला चालना मिळेल. मात्र, उद्योगमंत्र्यांना नाशिकचा विसर पडल्याचे चित्र आहे. नाशिककरांची नाराजी नको, म्हणून गेल्यावर्षी उद्योगमंत्र्यांनी एक मोठा प्रकल्प नाशिकला येणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात हा प्रकल्प अहमदनगरला जाणार असल्याचे पुढे आले.
किंबहुना किमान नाशिकमध्ये तशा हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. पालकमंत्री दादा भुसेंनी मात्र उद्योगमंत्र्यांची पाठराखण करीत दावोस येथे सुरू असलेल्या जागितक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून मोठे उद्योग नाशिकला येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागील दहा-पंधरा वर्षांत नाशिकला एकही मोठा उद्योग आलेला नाही. नाशिक मेट्रोचा प्रस्तावसुद्धा धूळ खात पडला आहे.
यामुळे नाशिकच्या उद्योगविश्वात नाराजीचे वातावरण आहे. गतवर्षी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून लाखो कोटींची गुंतवणूक येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात तशी कोणतीही गुंतवणूक नाशिकमध्ये पोहोचलीच नाही. सद्यःस्थितीत यंदाची आर्थिक परिषदेची दावोस येथे बैठक सुरू झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिष्टमंडळ रवाना झाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, असे असताना नाशिकचे काय, असा प्रश्न अनुत्तीर्ण आहे. नाशिकला इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक क्लस्टरची घोषणा उद्योगमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्या घोषणेबाबत अद्याप फार काही हालचाली सुरू नाहीत. नाशिकचा रखडलेला विकास असा महत्त्वाचा मुद्दा आगामी निवडणुकांच्या प्रचारात विरोधकांच्या हातात आहे, तर सत्ताधारी गटाला याची कारणमीमांसा करताना दमछाक होणार आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्र्यांचा बचाव करताना नाशिकच्या क्षमतेबाबत चर्चा केल्याचे तसेच उद्योगमंत्री अनेकदा नाशिकला येऊन गेल्याचे सांगितले. यंदाच्या दावोस परिषदेमधून नाशिकसाठी नक्कीच काही तरी हाती लागेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्याचे नक्की काय होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.