

Nashik News, 02 Jun : नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाऊन्सर टाकला आहे. राजकारणात दिसते तसे घडत नसते. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेऊन त्यांनी महायुतीची सोय केली की गैरसोय? यावर खल सुरू झाला आहे.
भाजपने नाशिकच्या जागेवर पाणी सोडून आपल्या राजकीय आकांक्षांना आवर घातला आहे. ही जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला सुटली. आता खऱ्या राजकीय डावपेचांना सुरुवात होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेतर्फे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना आणि भाजपकडे मतांची भक्कम संख्या आहे. एका दृष्टीने दराडे यांनी अर्ज दाखल करताच त्यांचा विजय झाला असे म्हणता येईल. मात्र, राजकारण बे भरवशाचे असल्याने पहिल्याच दिवशी दराडे यांना त्याचा अनुभव आला आहे. विरोधक असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली.
मात्र त्याच वेळी सहकारी पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दराडे यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. नरेंद्र दराडे आणि मंत्री छगन भुजबळ दोघेही येवला मतदारसंघाचे आहेत. येवला मतदारसंघात दराडे हे भुजबळांचे विरोधक आहेत. किंबहुना दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला तरी भुजबळ यांनी ती मैत्री जाहीरपणे झीडकारली आहे. त्याचा इफेक्ट दिसू लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात पाच आमदार आणि दोन मंत्री आहेत. यातील एकही दराडे यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी भुजबळ यांचे समर्थक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दराडे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनी आपली पूर्ण शक्ती येवला मतदारसंघात भुजबळ यांच्या विरोधात एकवटली होती. भुजबळ आणि दराडे-कांदे यांचे राजकीय सख्य लपून राहिलेले नाही. विधान परिषद निवडणुकीत ते कोणत्या स्वरूपात उघड होते, याची उत्सुकता आहे.
दराडे यांच्या घरात किशोर आणि स्वतः नरेंद्र हे दोघे भाऊ आमदार आहे. राजकीय विचारधारा किंवा जनाधार म्हणून त्याकडे आजवर पाहिले गेलेले नाही. निवडणूक जिंकण्याचे कसब मात्र त्यांच्याकडे निर्विवाद आहे. माजी आमदार दराडे यांच्या मार्गात त्यामुळेच अनेक अडथळे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सहकारी पक्षांतूनच त्यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकण्यात आले आहे.
त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक पूर्णतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि अन्न व पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या मर्जीवर अवलंबून असेल. त्यामुळेच नाशिक विधान परिषदेची निवडणूक सुरू होण्याआधीच तिला जाहीर गटबाजीचे ग्रहण लागले आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक सुकर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरीच धावपळ करावी लागेल हे लपून राहिलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.