

Nashik Kumbmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. या कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्यांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची तंबी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र असे असतानाही या कामांमध्ये आता नगरसेवकच अडथळा आणत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने पंचवटी विभागात सुरु असलेली रस्त्यांची कामे अडविल्यानंतर संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे तक्रार करत पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. हा प्रकार ताजा असतानाच पंचवटीत मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या रामकाल पथचे काम एका झेरॉक्स नगरसेवकाने बंद पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी तात्काळ बंद करण्यात आलेल्या प्रकल्पस्थळी भेट दिली. त्यांनी काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देत संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याच्या सूचना केल्या. तसेच, कामाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तासह महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचाही निर्णय घेतला.
प्रसिद्ध काळाराम मंदिर ते रामतीर्थ या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रामकाल पथचे काम सुरु आहे. मात्र एका झेरॉक्स नगरसेवकाने हे काम बंद पाडल्याची तक्रार आयुक्त मनिषा खत्री यांना प्राप्त झाली. त्यावर त्यांनी तत्काळ अॅक्शन घेत काम पुन्हा सुरु केलं. तसेच आता या कामाला पोलिस बंदोबस्त पुरविणार असून महापालिकेचे सुरक्षारक्षकदेखील कामांच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी नियुक्त केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण करायची आहे. असे असताना या कामांमध्ये कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर महापालिकेकडूनच गुन्हे दाखल केले जातील असा इशारा महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी दिला आहे.
यापूर्वी पंचवटी विभागात सुरू असलेल्या आरटीओ कार्यालय (पेठ रोड) ते राज स्वीट चौक (दिंडोरी रोड), पुढे रासबिहारी शाळा, निलगिरी बाग चौक आणि टाकळी एसटीपीपर्यंतच्या सुमारे आठ किलोमीटर रस्त्याच्या कामादरम्यान अडथळ्यांचे प्रकार समोर आले आहेत. काही नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पस्थळी जाऊन कामाबाबत वारंवार चौकशी करत कामात हस्तक्षेप केला, तसेच कामगारांना शिवीगाळ व धमक्या दिल्याच्या तक्रारी आहेत. बेकायदेशीर आर्थिक मागण्यांसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत मे. ए. के. शिवहरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने थेट महापालिका आणि पोलिस आयुक्तांकडे पत्र पाठवून कामासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.