

Mumbai News : लोकसभा निवडणुकांच्या चर्चा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी महाराष्ट्रात आले आणि नगर जिल्ह्यांत सभा घेऊन मोदींनी निवडणुकांच्या प्रचाराची झलक दाखवली. या दौऱ्यात मोदी यांनी श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी उभारलेल्या संकुलाचे उद्घाटनही केले. विशेष म्हणजे या संकुलाची पायाभरणीही मोदी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये शिर्डीत केली होती. याच संकुलाचे लोकार्पणही त्यांच्या उपस्थितीत झाले होते. याचे श्रेयही मोदींनी घेतले.
शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा-सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने ट्रस्टच्या तत्कालीन ‘सीईओ’ रुबल अग्रवाल यांनी संकुलाच्या उभारणीची योजना आणली. तेव्हा मोदींना बोलावून अग्रवाल यांनी ग्रँड ‘इव्हेंट' घेतला आणि आपली प्रशासकीय ताकद दाखवून दिली. या संकुलाचे काम वेळेत आणि चांगले करण्यावर रुबल अग्रवाल यांचा भर राहिला.(PM Narendra Modi Shirdi Visit)
विशेष म्हणजे, पुढच्या काळात म्हणजे जानेवारी २०१९ मध्ये रुबल अग्रवाल यांची बदली होऊन त्या पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर आल्या. त्यानंतरही शिर्डीत जाऊन अधूनमधून संकुल आणि इतर कामांची पाहणी करत होत्या.
या संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा विद्यमान विश्वस्थ आणि स्थानिकांनी त्याच्या लोकार्पणालाही मोदींना बोलावले. त्यामुळे पायाभरणी केलेल्या संकुलाचे उद्घाटन आपल्याच हस्ते झाल्याने मोदींनी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, निळवंडे प्रकल्पासाठी राजकीय नेते गेल्या 53 वर्षांपासून नारळ फोडण्याचे काम करत आहे. यात तीन पिढ्या गेली आहेत. या धरणातून 182 गावांना पाणी मिळणार आहे. धरण पूर्ण झाले असले, तरी कालव्यांचे कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. साईबाबांच्या 'सबका मालिक एक', या मंत्रानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ, सबका विकास', प्रेरित आहे.
यशवंतराव चव्हाणसाहेबांचीदेखील महाराष्ट्राविषयी हीच भूमिका होती. त्यामुळे आम्ही महायुतीत आलो आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांनी कष्टाने कमवलेल्या कामाला मोल देण्याचे काम करत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मोदींचा पवारांवर हल्लाबोल...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवार यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो. मात्र, सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले. परंतु, आपल्या सरकारने सात वर्षांत साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितलं.
नगर हा जिल्हा नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे. सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. सहकार क्षेत्राचा मोठा पगडा राहिलेल्या नगर जिल्ह्यात साखर कारखाने, दूध संघ, शैक्षणिक संस्था, सहकारी बँका यांच्या माध्यमातून मतदारसंघावर वर्षानुवर्षे स्थानिक नेत्यांची आपल्या मतदारसंघावर पकड राहिली आहे.
यात विखे पाटील, थोरात, पिचड, काळे-कोल्हे, तनपुरे यांसारख्या अनेक मातब्बर घराण्यांनी जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणावर पकड ठेवली आहे. कधी काळी नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दबदबा होता; पण २०१४ नंतर मात्र चित्र बदलले गेले आहेत. आता भाजपने नगरच्या राजकारणात वर्चस्व निर्माण केले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.