Nashik, 28 April : नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. ही मत विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत.
नाशिक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्यासह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Shantigiri Maharaj) यांच्या कुटुंबातील सदस्यही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. आज याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर नाशिक मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची चिन्हे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. तीन आठवड्यांपूर्वी ही उमेदवारी जाहीर झाली. मतदार संघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्या तुलनेत महायुतीचा उमेदवार कोण हा गोंधळ संपलेला नाही. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनीही मतदारसंघात प्रचार फेऱ्या काढल्या आहेत. या परिस्थितीत शांतिगिरी महाराजांचे समर्थक हे प्रामुख्याने हिंदुत्ववादी मतदार असतील. शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणीचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शनिवारी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपण उमेदवारी करू नये, त्याऐवजी अन्य काय उपाययोजना करता येतील, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सध्या आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. हाच शांतिगिरी यांचादेखील हेतू असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे दोघांचाही हेतू एकच असल्याने शांतिगिरी यांनी या वेळी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती बोरस्ते यांनी केली. शांतिगिरी महाराज यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिलेला नाही. आपला प्रचार सुरू झालेला आहे, त्यामुळे आता त्यावर विचार करता येणार नाही, असे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. सोमवारी ते पुन्हा एकदा अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते आपल्या भक्तगणांच्या मिरवणुकीसह अर्ज भरण्यासाठी जातील. या निमित्ताने ते आपले शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, ही चर्चा सध्या जोरात आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या उमेदवाराने महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही चिंतेने ग्रासले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.