

Mumbai, 29 March : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सुरू झालेली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मध्यंतरी थांबली होती. मात्र, आमदार सुनील शेळके यांच्या विधानानंतर ती पुन्हा सुरू झाली आहे. आमचा पक्ष मोठा होत असेल तर सर्वांनी त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे, असेही शेळकेंनी म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात मी कमेंट करावी, अशी कोणतीही स्टेज सध्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आपापसांत कोणी काय बोलले असेल.
शेवटी असं आहे की, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार (Sunetra Pawar) यांचं काही मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काही मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे, असं कोणतंही कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, असं विधान केले होते. ते त्यावेळी चांगलेच चर्चेत आले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून टीका करण्यात आली. खुद्द पवारांनी फडणवीसांना टोला लगावला होता.
आमदार सुनील शेळके काय म्हणाले?
आमदार शेळके म्हणाले, दोन्ही पक्ष एकत्र येत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. अजितदादांच्या उत्तराधिकारी या सुनेत्रा पवारच व्हाव्यात, अशी आम्हा सर्व आमदारांची भूमिका होती. त्यानुसार त्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा झालेल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्ष मोठा होत असेल आणि त्यांचे नेतृत्व मान्य करत दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होऊन पक्ष पुढे जात असेल तर त्यात आम्हालाही अभिमान असेल. पक्ष मोठा होत असेल तर सर्वांनी त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जातील, असंही माझं मत आहे, असेही सुनील शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.