
थोडक्यात बातमी:
महायुतीत अंतर्गत अस्वस्थता:
सत्तेवर येताना एकदिल असलेल्या महायुतीत सत्तावाटप, मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदावरून सुरू असलेले मतभेद आता आणखी तीव्र झाले असून मुख्यमंत्री शिंदे यांची अस्वस्थता वाढली आहे.
भाजप व अजित पवार यांची आक्रमक खेळी:
फडणवीस आणि अजित पवार यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांमध्ये पराभूत उमेदवारांना पक्षात घेऊन शक्तिबळ वाढवण्यास सुरुवात केली आहे.
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे दबावाचे राजकारण:
सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी यापूर्वी अमित शहा यांची भेट घेतली, तर आता पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. यामागे अंतर्गत दबाव आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.
Maharashtra News : राज्यात दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या महायुतीत सरकारमध्ये पहिल्या दिवसांपासून खटके उडताना दिसून येत आहे. एकीकडे तीनही प्रमुख नेत्यांकडून महायुतीत कोणताही दुरावा नसल्याचं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले जात असले तरी, कुठे ना कुठे ना शंकेला वाव मिळावी अशा हालचाली पडद्यामागं सुरू असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. याअगोदर खातेवाटप, मंत्रिपदं, पालकमंत्रिपदावरुन वाद पेटल्यानंतर आता महायुतीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) अस्वस्थता उफाळून आल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या नव्या खेळीमुळे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे चांगलेच अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण सलग दुसर्या आठवड्यात शिंदे दिल्ली दौर्यावर जाणार आहे.विशेष म्हणजे या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. पण ही तयारी सुरू करतानाच महायुतीत इनकमिंग सुसाट सुरू ठेवलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातच इनकमिंग सुरू ठेवतानाच तेथील पराभूत उमेदवारांना पक्षात आणत मोठी खेळी खेळली आहे. तसेच आगामी स्थानिकच्या निवडणुकांमध्ये या नेत्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील वादाचा विषय इथेच सुरू होतो. कारण पराभूत नेत्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर या नेत्यांना आत्तापासूनच ताकद दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे फडणवीस आणि अजित पवारांनी स्थानिकच्या निवडणुकांसह 2029 ची तयारी सुरू केली की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
पुण्यातील पुरंदर मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत, तिथे आता भाजपनं काँग्रेसच्या संजयकाका जगताप यांना पक्षप्रवेश दिला आहे. जालना येथे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार असून तिथे भाजपनं काँग्रेसचे माजी आमदार कैलास गौरंट्याल यांना गळाला लावलं आहे.
भूम-परांडा मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आहेत. तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार राहुल मोटे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणत मोठी खेळी खेळली आहे.
तसेच खासदार सुनील तटकरेंनी रायगडमध्ये महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश तटकरे यांनी घडवून आणला. यातून तेथील शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांना मतदारसंघातच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला. आता त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनाही राष्ट्रवादीत आणले आहे. त्यातून त्यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धीच कमी केल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या याच धक्क्यांचा धसका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदेंच्या सलग दुसर्या आठवड्यात होत असलेल्या शिंदेंच्या दिल्ली दौर्यामागं हेही एक कारण असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे ते पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये अस्वस्थ आहेत की काय याबाबत चर्चा सुरू आहे. शिंदेंनी दिल्ली दौर्यादरम्यान गेल्याच आठवड्यात बुधवारी (ता.30जुलै) रात्री उशिरा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची गुप्तपणे भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती.
विशेष म्हणजे लवकरच सुप्रीम कोर्टाचा शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतचा निकाल लागणार असल्याने याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दिल्लीत नेतेमंडळीच्या गाठीभेटी घेत आहेत का? याचा अंदाज बांधला जात आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात आले होते. तर काही मंत्र्यांना ईडीकडून नोटिसा आल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी राज्यातील राजकारणाबाबत त्यांची विस्तृतपणे चर्चा झाली होती. त्यानंतरही राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याने त्यांनी ही भेट घेतली असण्याची शक्यता आहे.
आता पुन्हा एकदा शिंदे दिल्लीला जात असून ते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे या दौर्यामागं वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात असतानाच त्यात फडणवीस आणि अजितदादांची नवी खेळीही कारणीभूत असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
प्रश्न: महायुतीत सध्या कोणते मतभेद दिसून येत आहेत?
उत्तर: खातेवाटप, मंत्रिपद व पालकमंत्रिपदावरून असंतोष असून शिंदे गट अस्वस्थ आहे.
प्रश्न: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काय नवीन राजकीय चाल खेळली?
उत्तर: त्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये पराभूत नेत्यांना पक्षात सामील करून ताकद वाढवली आहे.
प्रश्न: एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा का चर्चेत आहे?
उत्तर: त्यांनी अमित शहा यांची गुप्त भेट घेतली असून आता मोदींची भेट घेणार आहेत, यामागे अंतर्गत दबाव मानला जात आहे.
प्रश्न: सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा या राजकारणाशी काय संबंध आहे?
उत्तर: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर निकाल येणार असून त्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.