Mumbai News : राज्यातील शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीमधील सदस्यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Jayant Patil's criticism of CM On committee of 'CM Majhi Shala-Sundar Shala' campaign)
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे, त्यावरील देखरेख आणि नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती, तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती नेमण्यात आली आहे. ही राज्यस्तरीय सुकाणू समिती १६ जणांची आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे खासगी आणि विशेष कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षणमंत्री केसरकर यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक, शिक्षण विभागाचे सहसचिव, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुकेरीकर आणि शिक्षणमंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. या नियुक्तीवरूनच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य बनविले आहे.
आमदार जयंत पाटील यांनी ट्विट करत सरकारच्या धोरणावर बोट ठेवले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. असा प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत मंत्री, सचिव व संबंधित विषयावरील तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन केल्या जात असत. पण, आता मंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्याची नवीन पद्धत सुरू केली जात आहे, असा आरोपही माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.