
Kalyan Political News : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित श्रीकांत शिंदे हे 2014 पासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पहिल्याच टर्ममध्ये मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे यांचाही समावेश होतो. वयाच्या 27 व्या वर्षी श्रीकांत शिंदे हे लोकसभेचे सदस्य झाले होते. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी डीवाय पाटील विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी एमएस (ऑर्थो) केले. त्यांनी दोन वर्षे आरोग्यसेवाही दिली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला तो थेट लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातूनच. 2014 ला त्यांना पहिल्यांदा वडील एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी कल्याण मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. ठाणे -कल्याणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यांच्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही हातभार लावला. एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात मतदारसंघातील जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली. याच कामाच्या जोरावर श्रीकांत शिंदे हे 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाले. Kalyan Lok Sabha Constituency, Lok Sabha Election 2024
विकासकामांना प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोनाकाळात त्यांनी आरोग्य सेवेसंदर्भात केलेले कार्य उल्लेखनीय होते. कल्याण मतदारसंघातील वैद्यकीय सुविधा बळकट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये माफक दरात एमआरआय आणि सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली. ठाण्यात 2500 खाटांचे आठ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात श्रीकांत शिंदे यांचे मोलाचे योगदान होते. यासह संसदेतही त्यांनी आपली उपस्थिती लावण्यासह मोदी-शहा यांच्यासोबत चांगले संबंध निर्माण करत दिल्ली दरबारीही आपली छाप पाडली आहे. त्यांच्या संसदीय कामकाजाची दखल घेत त्यांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनात पक्षाच्या महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सक्रिय आहेत. शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेना पक्ष ताब्यात येईपर्यंत ठाणे जिल्ह्यासह राज्यातील इतर लोकप्रतिनिधींसोबत समन्वय ठेवणे, लोकसभेतील खासदारांचा वेगळा गट निर्माण करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांनी पार पाडली. एवढेच नाही तर भाजपसोबत गेल्यानंतर भाजप वरचढ ठरणार नाही, याची काळजी देखील ते घेताना दिसून येतात. पालघर असेल किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनाच लढणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, आता स्वत: श्रीकांत शिंदे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणागंणात उतरून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, सद्यस्थितीत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील शीतयुद्ध, तसेच गणपत गायकवाड यांचे गोळीबार प्रकरणामुळे श्रीकांत शिंदेच्या विजयाच्या मार्गात अडथळे तर निर्माण होत नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
श्रीकांत एकनाथ शिंदे
4 फेब्रुवारी 1987
एमबीबीएस, एमएस (ऑर्थो)
श्रीकांत शिंदे यांचा जन्म राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्रींचे नाव लता शिंदे असे आहे. त्यांच्या पत्नीचे नाव वृषाली शिंदे असे आहे. श्रीकांत शिंदे यांना रुद्रांश नावाचा एक मुलगा आहे.
व्यवसाय
कल्याण
शिवसेना (शिंदे गट)
श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली. श्रीकांत शिंदे यांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागले नाहीत. वडील एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात सक्रिय होते. त्यामुळे मूळ व्यवसायाने डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचा राजकारणातील प्रवेश अगदी सुकर झाला. अगदी सहजपणे त्यांना 2014 मध्ये थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. दरम्यानच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कळवा येथील शिवाजी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून दोन वर्षे प्रॅक्टिसही केली. ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवा राजकारणी म्हणून ओळखले जात होते.
2014 च्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा पराभव केला. मोदी लाटेत त्यांचाही सहज विजय झाला होता. शिंदे यांना 4 लाख 40 हजार 892, तर परांजपे यांना 1 लाख 90 हजार 143 मते मिळाली होती. खासदार झाल्यानंतर शिंदे यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला. संसदेच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाकाच लावला होता. त्याच काळात राज्यातही शिवसेना आणि भाजप सरकार सत्तेत होते. त्या सरकारमध्ये वडील एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिमंडळातील प्रमुख खाती होती.
पुढे 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आणि ते दुसऱ्यांदा विजयी झाले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला. शिंदे यांना 5 लाख 59 हजार 723, तर पाटील यांना 2 लाख 15 हजार 380 मते मिळाली होती. दुसऱ्या टर्ममध्ये कोरोनाकाळात पेशाने डॉक्टर असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघ आणि कोकणात आरोग्यसेवा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. मतदारसंघातील गरजू रुग्णांना आयसीयू बेड, कोव्हिड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली होती. या काळात केंद्र सरकारकडून मिळालेल्या खराब व्हेंटिलेटर प्रकरणी श्रीकांत शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यामुळे श्रीकांत शिंदे देशभरात चर्चेत आले होते.
दरम्यान, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असतानाही शिंदे पिता -पुत्रांनी शिवसेनेत आपला स्वतंत्र गट सक्रिय करण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेत एकनाथ शिंदे नाराज असल्याचे अनेकदा चर्चेतही येत होते. अखेर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सूरतमार्गे गुवाहटीला जात बंड केले आणि शिवसेना पक्ष फोडला. शिवसेना पक्ष, चिन्हावरही ताबा मिळवला. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी ठाणे मतदारसंघात पुढाकार घेऊन वडिलांच्या बंडानंतर झालेली असंतोषाची परिस्थिती मोठ्या धाडसाने हाताळली होती. श्रीकांत शिंदेंसह 13 खासदारांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यासाठी पडद्यामागील सूत्रे श्रीकांत शिंदे यांनी हलवली होती. त्यानंतर युवासेना फोडून शिंदे गटात सहभागी करून घेण्यातही त्यांचाच हात असल्याचे बोलले जाते. या सर्व घडामोडींनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच शिवसेनेचा कारभार पाहण्यात श्रीकांत शिंदे हे प्रमुख भूमिका निभावताना दिसून येत आहेत. दरम्यान, आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे सज्ज असून, यावेळी त्यांना खासदार म्हणून विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वीपासून मतदारसंघात सक्रिय होते. एकनाथ शिंदे शिवसेनेचे एक प्रमुख नेते आणि आमदार म्हणून काम करत असताना श्रीकांत शिंदे हे त्यांच्यासोबत राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय होतेच. 2014 मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली. खासदार निधीतून त्यांनी मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लाइनचे विस्तारीकरण, बहुचर्चित अशा जनतेच्या सोयीचा असलेल्या पत्री पुलाचे काम पूर्ण करून घेतले. डोंबिवली येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करून घेतले. श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी मतदारसंघात आरोग्य सेवेवर भर दिला. कामगारांसाठी अद्ययावत रुग्णालय स्थापन केले. मतदारासंघातील वाहतूक कोडींचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी मोठे रस्ते, पादचारी पूल, कल्याण डोंबिवलीसाठी रिंग रोडचे काम पूर्ण केले.
कोरोनाकाळात त्यांनी मतदारसंघासह ठाणे, पालघर, सिंधुदुर्गपर्यंत आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर दिला. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य सेवा उपलब्ध केल्या. त्यामध्ये एक रुपयात उपचार, कोरोना मास्कचे वाटप, कोव्हिड केअर सेंटरची उभारणी आदींचा समावेश आहे. गरजू विद्यार्थ्यांना अर्थसाह्य करणे, दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, खासदार निधीतून हजाराहून अधिक दिव्यांगांना मोफत ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड आदी उपकरणांचे वाटप केले आहे. कोव्हिड काळात शिंदे फांऊडेशनच्या वतीने त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. कोरोना काळात असंघटीत कामगारांना अन्न-धान्याचा पुरवठा, आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी अर्थसाह्य केले आहे. मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, कुस्ती, क्रिकेटच्या स्पर्धा, दहिहंडी या माध्यमातून ते सातत्याने समाजकार्यात सक्रिय दिसून येतात.
2019 च्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता.
श्रीकांत शिंदे यांनी 2019 ची निवडणूक ही शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार म्हणून लढवली होती. त्यावेळी राज्यातही युतीचे सरकार होते. एकनाथ शिंदे हे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. मुळात वडील एकनाथ शिंदे यांच्यामुळेच श्रीकांत शिंदे यांची मोठी ओळख होती. एकनाथ शिंदे त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना मानणारा मतदारवर्ग मोठा आहे. त्याशिवाय ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याचा फायदा श्रीकांत शिंदे यांना झाला.
श्रीकांत शिंदे हे विकासकामांच्या बळावर मतदारांना सामोरे गेले. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारमधील मंत्री, कार्यकर्ते अशी भली मोठी फौज त्यांच्या प्रचारासाठी दिमतीला होती. 2019 च्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा प्रभाव ओसरला नव्हता. त्यातच केंद्र सरकारने पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्याचेही भांडवल निवडणूक प्रचारात करण्यात आले होते.
तत्कालीन परिस्थितीत राज्यात, ठाणे जिल्ह्यात आणि महापालिकेत युती सरकारचा प्रभाव होता. एकनाथ शिंदे यांचे दांडगा जनसंपर्क आणि पक्ष संघटनेचा फायदा श्रीकांत शिंदे यांना झाला. या उलट बाबाजी पाटील हे तुल्यबळ उमेदवार मानले जात नव्हते. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे फारसे वर्चस्व नव्हते. त्यातच पक्षातंर्गत कुरघोडीचाही फटका पाटील यांना बसला.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघात फारसा वावर नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी देखील नुकतेच राजकारणात प्रवेश केल्याने श्रीकांत शिंदे हे मोदी लाट आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदरासंघातील एकहाती वर्चस्वाच्या जोरावर निवडून आले होते. दरम्यान, खासदार झाल्यानंतर मात्र श्रीकांत शिंदे हे मतदारसंघात चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळाले. मतदारसंघात त्यांनी विकासकामांचा धडाकाचा लावला. त्यातच एकनाथ शिंदे यांचा मुलगा आणि स्वत: खासदार असल्याने त्यांच्या जनसंपर्क अधिक प्रभावी झाला होता. श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित आणि तरुण खासदार असल्याने तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्क चांगलेच विस्तारले होते.
कोरोनाकाळात श्रीकांत शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेऊन केलेल्या आरोग्यसेवेमुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरतला जाऊन केलेले बंड आणि त्यानंतर शिवसेनेवर मिळवलेला ताबा, याकाळात सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांनी हाताळलेली प्रसिद्धी आणि कार्यकर्त्यांचा कमवलेला विश्वास यामुळे त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा अधिकच विस्तारल्या आहेत.
खासदार शिंदे सोशल मीडियाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करतात. यासह श्रीकांत शिंदे यांनी आपली आणि शिवसेना पक्षासाठी उभारलेली सोशल मीडिया टीमही अधिक सक्षम केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती ते शेअर करतात. याशिवाय आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियाचा तितक्याच ताकदीने वापर करतात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून शिवसेना पक्ष ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडियावर खोके सरकार, गद्दार म्हणून होणाऱ्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. शिंदे आणि शिंदे गटाची भूमिका कशी योग्य होती, हे पटवून देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे. स्वत:च्या सोशल मीडिया खात्यावरून देखील श्रीकांत शिंदे हे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती सातत्याने मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वलयात श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणाचा उत्कर्ष झाला आहे. शांत, संयमी असलेले श्रीकांत शिंदे हे वेळप्रसंगी तितकेच आक्रमक होतात. शिवसेना फुटीनंतर ज्यावेळी पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आला तेव्हापासून मात्र श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय वक्तव्यांना धार आली. सुरुवातीला ठाकरे कुटुंबाच्या अगदी जवळ असल्याने ठाकरेंचे राजकारण कशा पद्धतीने चालते, त्यातील काही अंतर्गत बाबी शिंदे यांना चांगल्या प्रकारे माहिती होत्या. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी ठाकरे गटावर विविध वक्तव्ये करून निशाणा साधला. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचा तू कोण रे..? असा एकेरी भाषेत समाचार घेतला होता. तसेच "तुमचं वय किती, बोलता किती. मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे, तेवढं तुमचे वयही नाही. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व फुकट मिळाले असल्याची टीका श्रीकांत शिदेंनी आदित्य ठाकरेंवर केली होती. मर्सिडीजमधून शिवसेना वाढू शकत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. घाम गाळावा लागतो, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे कुटुंबावर निशाणा साधताना श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांनीच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला होता. दरम्यान, नुकतेच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या रामावरील वक्तव्याचा समाचार घेताना आव्हाड यांनी मुंब्रामध्ये जाऊन औरंगजेब, खिलजीवर प्रवचन द्यावे, अशी टीका केली होती.
एकनाथ शिंदे
श्रीकांत शिंदे यांची सध्या लोकसभेची दुसरी टर्म सुरू आहे. शांत, संयमी आणि विकास कामांनाप्राधान्य देणारे उच्चशिक्षित खासदार म्हणून त्यांना ओळखले जाते. महाविकास आघाडीचा काळ वगळता ते एनडीएचे खासदार म्हणून सक्रिय आहेत. राज्यात देखील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. या सरकारचे नेतृत्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत असल्याने श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाजू मानली जाते. खासदार म्हणून त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यातच भाजपला यावेळी 400 हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप यासह केंद्रातील एनडीए सरकार आणि अदृश्य शक्तीचा आगामी निवडणुकीसाठी फायदा होणार आहे. एकनाथ शिंदे हेच आता शिवसेनेचे प्रमुख नेते असल्याने श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होणार नाही अथवा आव्हानही दिले जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम, ठाणे मतदारसंघातील शिवसेनेची ताकद, मराठा आरक्षणाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे यांची बदललेली इमेज, या सर्व गोष्टी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सकारात्मक आणि जमेच्या बाजू मानल्या जात आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्यासाठी बहुतांश बाजू सकारात्मक मानल्या जात आहेत. असे असले तरी त्यांच्यासाठी नकारात्मक बाजू म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा, पक्ष आदींवर दावा करण्यात आला. यामुळे शिवसेनेशी एकनिष्ठ मानला जाणारा मतदार शिंदे यांच्यावर नाराज आहे. शिंदे गटाला खुद्द ठाण्यातूनच मोठा विरोध झाल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेचे जे मतदान होते ते यावेळी विभागले जाणार आहे. राष्ट्रवादीत ही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो. अदृश्य शक्तीचा उल्लेख करत शिवसेनेवर ताबा मिळवला गेला. त्यानंतर ठाकरे गटाच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीही त्याच वाटेने अजित पवारांच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे जनतेमध्ये महायुतीविरोधात प्रचंड नाराजीचा सूर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत नक्कीच बसू शकतो.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहिले असता या ठिकाणी भाजपचे तीन आमदार तर शिंदे गटाचा एकच आमदार आहे. एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार आहे, तर एक मनसेचा आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असले तरी कल्याण मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यातच भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. भाजपचे दुसरे आमदार गणपत गायकवाड यांनी नुकताच केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर शिंदे आणि गायकवाड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्यासाठी विजयाचा मार्ग थोडासा खडतर मानला जात आहे.
श्रीकांत शिंदे हे आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी कल्याण मतदारसंघातून रिंगणात उतरतील. शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे एकमेव उमेदवारीचे दावेदार मानले जात आहेत. ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मागील दोन टर्मपासून खासदार आहेत. त्यामुळे सद्स्थितीत महायुतीच्या जागावाटपात कल्याण मतदारसंघ हा शिंदे गटालाच सुटण्याची शक्यता आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी न मिळण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.