Maharashtra Politics Live Updates : शिवसेना आमदार अपात्रतेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार गटाने दाखल केलेल्या पुरव्यांतील काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. त्यानुसार निकाल देताना नार्वेकरांनी विधिमंडळातील बहुमत लक्षात घेत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्यावर शिक्कामोर्तब केले. हा निकाल शरद पवारांना धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रया व्यक्त केल्या जात आहेत.
बहुमत महत्त्वाचं
2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांना (Ajit Pawar) पक्षातील 53 पैकी 41 आमदारांनी पाठिंबा दिला. शरद पवार गटाकडूनही 41 आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. यावरूनच कुणाकडे बहुमत आहे हे दिसते. त्यामुळे अजित पवार गटाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट होत असल्याकडे नार्वेकरांनी लक्ष वेधले. यानुसारच नार्वेकरांनी मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचे जाहीर केले.
अपात्र कोण?
अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) असल्याने त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यानुसार अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत. तर शरद पवार गटाचेही आमदारांना पात्र ठरवले आहे.
अध्यक्षपदाबाबत वाद
निकाल देताना मी बहुमताबाबतच बोलू शकतो, असे म्हणत नार्वेकरांनी पक्षाच्या नेतृत्वाबाबत बोलणे टाळले. या पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे या वादावर सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, असेही नार्वेकरांनी (Rahul Narwekar) सूचवले आहे.
पक्षातील राजकीय वाद
राष्ट्रवादीत अंतर्गत राजकीय वाद असून आमदारांची भूमिका ही पक्षांतर्गत बाब आहे. शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे, असे निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवले आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग होत नाही, याकडेही नार्वेकरांनी लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पवारांच्या याचिका फेटाळल्या
पक्ष फुटीनंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात तीन, तर अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) गटाविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या. यातील शरद पवारांच्या तिनही याचिका नार्वेकरांनी फेटाळल्या आहेत.
पक्षाची संरचना
राष्ट्रवादीच्या घटनेनुसार कार्यकारी समिती सर्वात महत्वाची असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. पक्षाची घटना, पदांची रचना, विधिमंडळातील संख्याबळ विचारात घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यानुसारच निर्णय घेतल्याचेही नार्वेकरांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.