
NCP News : महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नारज झालेल्या छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षातील अन्य सहकाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. शिवाय आपण मंत्रिपदासाठी नव्हे तर पक्षातील लोकांकडून जी वागणूक मिळाली त्यामुळे नाराज असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
भुजबळांनी केलेल्या याच सर्व वक्तव्यांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले, "भुजबळ साहेब हे भुजबळ साहेब आहेत. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा आमची भेट होऊ तेव्हा त्यांच्याशी सविस्तर बोलू.
सध्या समीर आणि पंकज भुजबळ यांच्यासबत आमची चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकरणावर दोन दिवसात पडदा पडेल, आम्ही त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करु." दरम्यान, यावेळी त्यांनी लोकसभेतील जागावाटपाच्या आणि तिकीटाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात भुजबळांची पटेलांशी चर्चा झाली.
अनेक विषयावर चर्चा होत असते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला मर्यादित जागा मिळाल्या. तर नाशिकमधून भुजबळांना लोकसभेसाठी उभं करण्याचं दिल्लीच्या बैठकीत ठरलं होतं. ते भुजबळांनी देखील मान्य केलं. पण उमेदवारी घोषित करायला उशीर झाला होता. त्यावर मी त्यावेळी खुलासा केला होता. मात्र, त्यानंतर भुजबळांनी लढण्यास नकार दिला.
जागावाटप करण्यात उशीर झाल्यामुळे त्यावेळी कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत आम्ही जास्त जागा जिंकलो. त्यावेळी जे घडलं ते नाकारता येत नाही, असंही तटकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, ज्या ज्या वेळी पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भुजबळ आमच्यासोबत होते, असा खुलासा देखील तटकरेंनी केला.
तर अजितदादा (Ajit Pawar) अर्थ खात्यासाठी आग्रही असून ते न मिळाल्यामुळे नाराज अजित पवार दिल्लीला गेले होते, याबाबतच्या चर्चांचं खंडण देखील त्यांनी यावेळी केलं. तटकरे म्हणाले, या सर्व चर्चा कल्पोकल्पित आणि निराधार असल्याचं तटकरेंनी यावेळी सांगितलं.
ते म्हणाले, केवळ तब्येतीच्या कारणामुळे अजितदादा भेटले नाही. ते नागपूरलाच होते. ते दिल्लीला आले नाहीत. ते नागपूरलाच घरी आराम करत होते. तब्येतीच्या कारणामुळे ते विधानसभेत आले नाहीत. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचं ठरवतील, खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.