

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीऐवजी फोटो अपेक्षित असताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झळकल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी सुरूच राहणार असं ठामपणे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितल्यानं मुश्रीफ यांचा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरुन ईडीच्या रडारवर आहेत. तसेच ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये सध्या उच्च न्यायालयाकडून मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. मात्र, तरीसुद्धा ते रडारवर असल्याचे सोमय्या यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. तर निवडणुकीपूर्वी अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील एका पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांना हसन मुश्रीफ यांनी जर भाजपामध्ये प्रवेश केला तर त्यांच्याविरोधातील सुरू असलेल्या चौकशा थांबवण्यात येणार का असा सवाल विचारण्यात आला. त्यावर सोमय्या म्हणाले, मुश्रीफ यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशा थांबवण्यात येणार नाही. मुश्रीफ यांनी दिलेली जाहिरातीमध्ये जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावला असेल तर हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. सोमय्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता सदैव कटिबद्ध असणार आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
भाजप(BJP)सोबत सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जावं या मताच्या असलेल्या काही नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेला तर भाजपकडून दुसरा पर्याय देखील शोधण्यात येत होत असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात जोरदारपणे रंगली होती.
त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत भाजपने सरकार स्थापन करावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक प्रमुख नेत्यांची मागणी होती. त्यामध्ये हसन मुश्रीफ यांचं नाव असल्याचं देखील सांगण्यात येत होतं. त्यामुळे या पत्रिकेमुळे पुन्हा एकदा मुस्लिम भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सोमय्याने त्यांच्याविरोधात कारवाई सुरूच ठेवू असं म्हटल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजप विरोधात असलेल्या अनेक नेत्यांविरोधात सोमय्या यांच्याकडून विविध प्रकरणात चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे मात्र त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा ईडीद्वारे चौकशी सुरू झाल्यानंतर काही दिवसांत चौकशी करण्यात येत असलेल्या नेत्यांनी भाजप तथा भाजप मित्र पक्षात प्रवेश केला की, त्या नेत्यांविरोधात चौकशी थंड होते असा आरोप विरोधी नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असतो.
सध्या शिंदे गटात असलेल्या खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक या नेत्यांविरोधात देखील सोमय्या यांनी तक्रार केलेली आहे. मात्र सध्या या नेत्यांविरोधात चौकशांचा ससेमिरा कुठेतरी थांबल्याचं पाहायला मिळालं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.