
Mumbai : मुंबई विद्यापीठ सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, 17 ऑगस्ट रोजी रात्री विद्यापीठाने निवडणूक स्थगित केली. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे मुंबईतील राजकारण चांगलंच तापलं. विद्यापीठाने सिनेट निवडणूक स्थगित केल्याने युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, युवक काँग्रेससह इतर विद्यार्थी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या.
आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray) नी सरकार निवडणुकांना घाबरत असल्याचं सांगत हल्ला चढवला. तर आदित्य ठाकरेंना उत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राहुल कनाल यांनी बोगस मतदार नोंदणी होत असल्यामुळे निवडणुका रद्द झाल्याचा आरोप केला होता. मात्र, अखेर विद्यापीठ प्रशासनाकडून निवडणुकीला स्थगिती का दिली याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाने गुरुवारी (17 ऑगस्ट) रात्री उशिरा परिपत्रक काढत सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. या अगोदर मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम 9 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. 10 सप्टेंबरला मतदान आणि 13 सप्टेंबरला निकाल असा हा कार्यक्रम होता. मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारच्या बैठकीत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. यावरुन राजकारण तापले आहे.
विद्यापीठाच्या स्थगितीच्या निर्णयावरुन आदित्य ठाकरेंनी रान पेटवत भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती. यानंतर भाजपच्या आशिष शेलारांनी देखील ठाकरेंवर निशाणा साधला होता. तसेच मुंबई विद्यापीठाकडे निवडणुकीला स्थगितीच्या निर्णयामागचा खुलासा मागितला होता. अखेर मुंबई विद्यापीठाकडून याबाबतचे सविस्तर स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे.
विद्यापीठ प्रशासनाचा मोठा खुलासा...
मुंबई विद्यापीठ प्रशासन म्हणाले, 9 ऑगस्टला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मतदारयादी (सुधारीत) प्रसिद्ध करण्यात आली होती. 17 ऑगस्ट 2023 ला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठास अंतिम मतदार यादी (सुधारीत) यामध्ये काही विसंगती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले. या विसंगतीची तात्काळ सखोल चौकशी करून त्याचदिवशी अहवाल सादर करण्यास कळवले.
त्या अनुषंगाने विद्यापीठाने मतदारयादीतील मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही, तसेच याबाबत योग्य ती सखोल चौकशी करण्याकरिता विद्यापीठास वेळ आवश्यक असल्याने शासनाने विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली असे विद्यापीठाने नमूद केले आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये मतदारयादीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होऊनच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक असल्याने मतदारयादी सुधारीत करून निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश देण्यात आले.यानुसार विद्यापीठाने 17 ऑगस्टच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका (Senate Election) भीती वाटत असल्यानेच पुढे ढकलल्या आहेत. तसेच आम्ही निवडणुकांसाठी १०० टक्के तयार आहे. पण निवडणुका पुढे ढकलणे हा काही पर्याय नाही. निवडणुका पुढे ढकलणे हा हुकुमशाही पध्दतीचा निर्णय आहे, असा हल्लाबोल मनसे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्यातील शिंदे - फडणवीस - पवार सरकारवर केला आहे.
राज्य सरकार आणि विद्यापीठाच्या हातातच विद्यार्थ्यांचं भविष्य आहे आणि हेच आता निवडणुका पुढे ढकलण्याबाबत स्पष्टीकरण देत नाही. त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. अनेक प्रश्न या निवडणुकांवर अवलंबून आहे. या सिनेटमध्ये नोंदणी बोगस झाली हे आपण मान्य करू. ती बोगस नोंदणी बाहेर काढायला किती दिवस पाहिजे हे तुम्ही सांगा ना असेही ते यावेळी म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.