
Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडले. यानंतर सर्वांनाच राज्यातील पालकमंत्री पदाची वाटणी महायुतीच्या तीन मित्र पक्षांमध्ये कशी होणार ? याबाबत उत्सुकता लागली आहे. त्यातल्या त्यात पुण्याचे पालकमंत्री पद कोणाच्या वाट्याला येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Murlidhar Mohol)
एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये भाजप (Bjp) आमदारांची संख्या जास्त असल्याने पालकमंत्री पद हे भाजप नेत्यालाच मिळावे, असा आग्रह स्थानिक नेत्यांचा आहे. तर दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार सोडतील, याची शक्यता फारशी कमी आहे, असे असले तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपावर भाजपचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाला आहे.
त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत देखील वेगळा निर्णय होऊ शकतो, अशी आशा पुणे जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्री पदाबाबत उघड-उघड बोलत असले तरी वरिष्ठ नेते मात्र याबाबत जास्त भाष्य करणं टाळत आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना देखील याबाबत विचारले असता त्यांनी मी चांगला बॅटसमॅन झालोय, असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली.
पुणे शहरात आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोहोळ म्हणाले, 'गेले 9 दिवस सुरू असलेला पुस्तक महोत्सव समारोप होतो आहे. विद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या शहरातून 10 लाख लोकांनी पुस्तक महोत्सवात आपला सहभाग नोंदवला या गोष्टीचा एक पुणेकर म्हणून मला अभिमान आहे. आयोजनाच्या माध्यमातून पुण्याच्या संस्कृतीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. अनेक विश्वविक्रम सुद्धा या महोत्सवात झाले आहेत, असे मोहोळ म्हणाले.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे शहराला दोन मंत्री पद मिळाले आहेत. याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, 'चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांच्या निमित्ताने दोन मंत्री पुणे शहराला मिळाले आहेत. त्यासोबतच पुणे जिल्ह्याला अजित पवार यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पद देखील मिळाले आहे. त्यासोबतच दत्ता भरणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणखी एक कॅबिनेट मंत्री पद देखील मिळाले आहे. हे पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री पद भाजपकडे राहणार की अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, 'स्थानिक पातळीवर भाजपच्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री पदाबाबत भावना असली तरी याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येतात. आमचे सगळे महायुतीचे नेते एकत्र बसून पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील.'
कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले पाहिजे का ? असे विचारले असता मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'तुम्ही कशी आणि कितीही गुगली टाकली तरी मी सावध आहे. यॉर्कर टाकला, गुगली टाकली तरी आता मी चांगला बॅट्समन झालो आहे,' असे म्हणत त्यांनी पालकमंत्री अजितदादा होणार का चंद्रकांतदादा याबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.