

Pune News : पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो नोकरदार ज्या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गिकेची गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत आहेत. मात्र, आता हिंजवडी ते शिवाजीनगर प्रकल्पाच्या उद्घाटनाचा पेच अखेर सुटला आहे. वारंवार बदलणाऱ्या तारखा आणि प्रशासकीय-तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय 'वॉर रूम' बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देत येत्या १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्याचे अत्यंत स्पष्ट आणि कडक निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाने यापूर्वी दिलेली 30 जूनची डेडलाईन सुरक्षा तपासणी, तांत्रिक परवानग्या आणि विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने हुकली होती. या पार्श्वभूमीवर, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर आता सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून 15 जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांवरून मेट्रो धावेल, अशी खात्री प्रशासनाने दिली आहे.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांच्या संथ कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. “पायाभूत प्रकल्पांसाठी 3 ते साडेतीन वर्षांची मुदत पुरेशी आहे. कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे होणारे आर्थिक नुकसान सरकार सहन करणार नाही,” असा कडक इशारा देत, कामे रेंगाळणाऱ्या कंत्राटदारांना यापुढे नवीन कामे दिली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
तब्बल 8 हजार 313 कोटी रुपये खर्चाचा आणि 23.2 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प देशातील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प आहे, ज्यासाठी टाटा-टीआरआयआयएल आणि सीमेन्स यांनी भागीदारी केली आहे. पहिल्या टप्प्यात 15 जुलैपर्यंत 12 स्थानके सुरू झाल्यानंतर, पुढील दोन महिन्यांत उर्वरित 11 स्थानके कार्यान्वित होतील.
दरम्यान, पुणे शहरात महामेट्रो आणि पीएमआरडीए अशा दोन यंत्रणांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ‘एकात्मिक तिकीट व्यवस्था’ तातडीने लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे प्रवाशांना दोन्ही मेट्रो नेटवर्कसाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज न पडता, एकाच तिकिटावर विनासायास प्रवास करणे शक्य होणार असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.