Pune News, 28 Nov : मालमत्तांच्या दस्त नोंदणीत बनावट कागदपत्रे आणि तोतया व्यक्तींचा वापर करून होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कंबर कसली आहे. यापुढे दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि जबाबदारी थेट दस्तावर नोंदवून घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव विभागाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.
शासनाची मंजुरी मिळताच या नवीन नियमांची अंमलबजावणी होणार असून, यामुळे बनावट दस्त बनविणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा होण्यासोबतच नोंदणी कर्मचाऱ्यांना होणारा नाहक मनस्तापही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे नेमका प्रस्ताव?
पुणे शहरात यापूर्वी बनावट कागदपत्रे जोडून, जुन्या सातबारा उताऱ्यांच्या आधारे आणि तोतया व्यक्ती उभ्या करून जमिनी व मालमत्तांचे व्यवहार नोंदविल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून कारवाई होते, मात्र अनेकदा नोंदणी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सहआरोपी केले जाते आणि त्यातून मोठे न्यायालयीन वाद निर्माण होतात.
सध्याच्या व्यवस्थेनुसार दस्तासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्याची जबाबदारी नोंदणी अधिकाऱ्यांवर नाही किंवा तशी तरतूद नोंदणी कायद्यात नाही. तसेच कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उपलब्ध नसल्याने गैरव्यवहार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप होऊन गुन्हे दाखल होतात. ही पळवाट बंद करण्यासाठी आणि मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.
नवीन तरतुदी नेमक्या काय असतील?
दस्तावर "मी तयार केला" किंवा "दस्त मी तयार केला आहे" असा शेरा लिहिणे बंधनकारक राहील. या शेऱ्याखाली दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे नाव, पत्ता आणि स्वाक्षरी नमूद करावी लागेल. कागदपत्रांची छाननी व पडताळणी करून दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीचे स्वसाक्षांकित ओळखपत्र दस्तासोबत जोडणे आवश्यक असेल. भविष्यात दस्तातील कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास, दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून तिच्यावर कायदेशीर कारवाई करणे शक्य होईल.
कलम ८२ च्या कारवाईला मिळणार बळ
नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम ८२ अन्वये बनावट व्यक्ती उभी करून किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. मात्र, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे किंवा छाननी न करता दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी निश्चित करण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या. नव्या प्रस्तावाला राज्य सरकारची हिरवा कंदील मिळाल्यानंतर जबाबदारीची साखळी स्पष्ट होईल आणि केवळ नोंदणी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलण्याची प्रवृत्ती थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.